मुंबई : बेस्ट कर्मचारी येत्या 7 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. वेतनवाढ व वेतन निश्चितीबाबतच्या रखडलेल्या मागण्यांवर कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने कर्मचारी संपावर जाणार आहेत.

बेस्ट महाव्यवस्थापकांसोबत कामगार संघटनेची आज बैठक पार पडली. मात्र या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. चर्चा निष्फळ ठरल्याने संप अटळ असल्याचं बोललं जात आहे. यापूर्वी संप करण्याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये मतदान घेण्यात आलं होतं. यामध्ये संप करण्याच्या बाजूने भरघोस मतदान झालं होतं.

तब्बल 30 हजार बेस्ट कर्मचारी विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत आहे. यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
काय आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

  •  बेस्टचा 'क 'अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या 'अ 'अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे

  • 2007 पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,390 रु. सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने वेतन निश्चिती केली जावी

  •  एप्रिल 16 पासून लागू होणाऱ्या नवीन वेतनकरारावर तातडीने वाटाघाटी सुरू करणे

  • 2016-17आणि 17-18 साठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस

  • कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न निकाली काढावा

  • अनुकंपा भरती सुरू करावी


अशा मागण्या बेस्ट वर्कर्स युनियनने केलेल्या आहेत.