पंढरपूर : सांगोला तालुक्याचे 93 वर्षीय आमदार गणपतराव देशमुख यांनी पाण्यासाठी आंदोलन छेडले आहे. तालुक्यातील तिसंगी तलावात पाणी सोडण्यासाठी त्यांनी हे आंदोलन सुरु केले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी गेल्या 48 तासांपासून टॉवर वर चढून आंदोलन केल्यानंतर तिसंगी तलावात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे मात्र पूर्ण  क्षमतेने पाणी सोडल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय आ. गणपतराव देशमुख यांनी घेतला आहे. या मागणीसाठी त्यांनी कालपासून आंदोलनस्थळी ठिय्या धरला आहे.


तिसंगी तलाव भरुन देण्यासाठी गेल्या 48 तासाच्या आंदोलनाला यश आले असून निरा उजवा कालव्यातून तलावात 100 क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पूर्ण क्षमतेने पाणी सोडल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय झाल्याने आ. देशमुख यांच्यसह सर्व आंदोलक शेतकऱ्यांनी आंदोलन सुरुच ठेवले आहे. आज पहाटे सहा वाजता कालव्यात पाणी आल्यावर गेले 48 तास टॉवरवर बसलेले आंदोलक सकाळी टॉवरवरुन खाली आले आहेत. मात्र हे पाणी पूर्ण क्षमतेने म्हणजे 400 क्युसेक विसर्गाने आल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे सांगताना आपण आंदोलन संपेपर्यंत इथेच थांबणार असल्याचे देशमुख यांनी सांगितल .


रामराजे नाईक निंबाळकर आणि अजित पवार यांच्यावर निशाणा

दरम्यान ही सर्व अधिकाऱ्यांची चूक असून पावसाच्या काळात या अधिकाऱ्यांनी तिसंगी तलाव भरुन न देता तब्बल २३ टीएमसी पाणी निरा नदीत सोडून दिल्याचा आरोप गणपतराव देशमुख यांनी केला आहे. गेल्या २० वर्षात आपण विधानसभेच्या विंगमध्ये देखील कधी उतरुन आंदोलन केले नाही, मात्र 90 वर्षात पहिल्यांदाच अधिकाऱ्यांकडून मोठा अन्याय झाल्यामुळे या आंदोलनात सहभागी व्हावे लागले असे देशमुख यांनी सांगितले.  कायद्यानुसार टेल टु हेड असे समन्यायी पाणीवाटप करणे गरजेचे असताना पुर्वीच्या जलसंधारण मंत्र्यांनी सत्तेचा वापर करुन नियम मोडत पंढरपूर व सांगोला तालुक्यांवर अन्याय केल्याचे सांगत त्यांनी रामराजे नाईक निंबाळकर आणि अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. 93 वर्षाचे गणपतराव देशमुख काल दुपारी आंदोलनाला भेट द्यायला आले होते. यावेळी परिस्थिती पाहुन ते स्वतः कालपासुन आंदोलनात सहभागी झाले आहेत. काल शेतकऱ्यांसोबत याच कालव्यावर झोपून सकाळी पुन्हा आंदोलनात सहभागी झाले आहेत. राज्य सरकारच्या एकाही मंत्र्यांनी अद्याप या आंदोलनाची दखल घेतली नसली तरी आम्ही लढून पाणी मिळवणार, असे देशमुख यांनी सांगितले.

उत्साह या वयातही तरुणाईला लाजवणारा
इच्छाशक्तीला वय नसते असे म्हणतात. ९३ वर्षाचे गणपतराव देशमुख यांचा उत्साह देखील या वयात तरुणाईला लाजवणारा आहे. गेली 55 वर्षे सांगोल्याचे आमदार म्हणून काम करणारे गणपतराव देशमुख काल दुपारीपासून तिसंगी तलावात पाणी सोडण्याचा आंदोलनात सहभागी झाले आहेत.  पंढरपूर तालुक्यातील या परिसरातील गावे सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडल्यामुळे काल दुपारी गणपतराव येथे भेट द्यायला आले आणि परिस्थितीचे गांभीर्य पाहून या आंदोलनात सहभागी झाले.  काल रात्री याच शेतकऱ्यांसोबत कालव्यावर जेवण करून रात्रही याच कालव्यावर उघड्यावर काढली.  आमदार-खासदारांचा लवाजमा आणि त्यांचा थाट पाहता गणपतरावांचा साधेपणा त्यांची नाळ मातीशी किती घट्ट जोडली गेली आहे हे दाखवून देते.  सकाळी शेतकऱ्यांसोबत चहा घेत तेथेच आपली औषधे घेऊन पुन्हा ताज्यादमाने आंदोलनाला बसलेले गणपतराव देशमुखांचा आदर्श आजच्या तरुणाईला दिशादर्शक ठरेल.