अमरावती: नोटाबंदीला येत्या नोव्हेंबर महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र अजूनही जुन्या नोटा सापडण्याचं सत्र सुरुच आहे. अमरवातीत मंगळावारी रात्री तब्बल 90 लाख रुपयांच्या जुन्या नोटा पकडण्यात आल्या. नागपूरवरुन अमरावतीत आलेल्या एका गाडीतून ही रक्कम हस्तगत केली.


याप्रकरणी अमरावती पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये नागपूरच्या अमित वाकडे आणि पुरुषोत्तम मिश्रा यांचा तर अमरावतीच्या संदीप गायधनेचा समावेश आहे.

जुन्या नोटा देऊन, त्याबदल्यात 25 टक्के नव्या नोटातील रक्कम देण्याच्या अटीवर, ही रोकड अमरावतीत आणली होती. मात्र पोलिसांना आधीच याबाबतची कुणकुण लागली होती.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून रात्री 9 च्या सुमारास, सर्किट हाऊस ते जेलरोड दरम्यान, एका गाडीतून या जुन्या नोटा पकडल्या.

पकडलेल्या जुन्या नोटांमध्ये पाचशे आणि हजाराच्या नोटांचा समावेश आहे. 90 लाख जुन्या नोटांच्या बदल्यात 25 ते 30 लाख रुपये नव्या नोटांस्वरुपात मिळणार होते. मात्र ही रक्कम कोण बदलून देणार होतं, याचा तपास आता पोलीस घेत आहेत.