यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरत यवतमाळ जिल्ह्यातील राजूरवाडी येथील शेतकरी शंकर चायरे यांनी तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. कुटुंबीयांनी तीन दिवस उलटूनही मृतदेह ताब्यात न घेतल्याने आज अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी त्यांच्या गावी जाऊन चायरे कुटुंबाची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.

अखेर तीन दिवसांपासून होणाऱ्या त्रासामुळे कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रशासनाकडून ठोस मदत जाहीर न झाल्याने कुटुंबीय नाराज झाले.

चायरे कुटुंबीयांची मनधरणी करण्यासाठी विभागीय आयुक्त पियुष सिंग, जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून राज्यमंत्री संजय राठोड उपस्थित होते. यावेळी काँग्रेस नेते नाना पटोले हे देखील उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका खासगी बँकेच्या नुतनीकरणासाठी यवतमाळला येणार होते. यावेळी मुख्यमंत्री भेट घेतील, अशी आशा चायरे कुटुंबीयांना होती. मात्र मुख्यमंत्री गरीबीला जाणणारे नाहीत, त्यांनी पळ काढला, हे आपलं सरकार नाही, असा आरोप शंकर चायरे यांच्या मुलीने केला.

मुख्यमंत्री भित्रे आहेत, ते गरीबाकडे आले नाहीत, सरकारनेच पतीची हत्या केली, असा आरोप शंकर चायरे यांची पत्नी अलका चायरे यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी तीन मुलींपैकी एका मुलीला शासकीय नोकरी द्यावी आणि भरीव मदत तात्काळ द्यावी, सोबतच शंकर चायरे यांच्या सुसाईड नोटनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

मोदींवर गुन्हा दाखल होईपर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही पटोले यांनी दिला. मुख्यमंत्री भित्रे आहेत, ते शेतकऱ्यांच्या रागाला समोरं जायला घाबरले, असंही पटोले म्हणाले.

संबंधित बातमी :

मोदी आत्महत्येला जबाबदार, शेतकऱ्याने विष पिऊन आयुष्य संपवलं!