Devendra Fadnavis Oath ceremony at Raj Bhavan : एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दोन आठवड्यांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना हाताशी धरुन सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले नेते उपमुख्यमंत्री झाले आहेत.  


आज राजभवनमध्ये हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 


1978 मध्ये महाराष्ट्रला पहिले उपमुख्यमंत्री लाभले होते. वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात नाशिकराव तिरपुडे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर सुंदरराव सोळंके, रामराव आदिक, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, विजयसिंह मोहित पाटील, आर आर पाटील आणि अजित पवार यांनी उप मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. अजित पवार यांनी सर्वाधिक चार वेळा उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आहे. आता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. 


दरम्यान, महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांचे हार्दिक अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील अराजकतेला लगाम बसेल व राज्य पुन्हा प्रगतिपथावर अग्रेसर होईल ही खात्री आहे, असे ट्वीट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेय. 


काय म्हणाले नड्डा?
जेपी नड्डा यांनी बोलताना सर्वात आधी नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्रातील सरकारचे अभिनंदन केलं. तसंच यावेळी भाजप सत्तेसाठी नाही तर विचारांसाठी लढतो असं म्हणत महाराष्ट्रातील जनतेचं भलं करणं हाच आमचा उद्देश असल्याचंही ते म्हटले. तसंच एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजप पूर्णपणे उभी असणार आहे, पण या भाजपच्या केंद्रीय टीमने देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये राहावं त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळावी, असं ठरवलं असल्याचं महत्त्वाचं वक्तव्य नड्डा यांनी यावेळी केलं.