शासनाकडे परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांकरिता वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. मात्र अद्यापपावेतो कुठलीही दखल घेण्यात न आल्याने शासनाचे लक्ष वेधण्याकरिता
महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन मार्फत आज राज्यव्यापी दोन तास कामबंद लक्षवेधी आंदोलन करण्यात येत आहे. पुणे, नाशिकमध्ये नर्सेसनी हे आंदोलन केलं. नाशिकमध्ये शासकीय जिल्हा रुग्णालय आणि विभागीय संदर्भ रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर परिचारांकांकडून आज सकाळी शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात येत निषेध नोंदवण्यात आला. परिचारिकांनी मोठ्या संख्येने यात आपला सहभाग नोंदवला होता.
काय आहेत परिचारिकांच्या मागण्या
- महाराष्ट्रातील परिचारिकांची वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग मिळून रिक्त असलेली 6 हजार पदे तातडीने भरावी तसेच कंत्राटीकरण करण्यात येऊ नये.
- परिचारिकांना रोटेशननुसार 7 दिवस कोविड ड्युटी व त्यानंतर 7 दिवस अलगीकरण रजा देण्यात यावी, कोविड ड्युटी 4 तासांच्या शिफ्टमध्ये असावी.
- कोविड बाधित व संशयित रुग्णाच्या सेवेत कार्यरत परिचारिकांना दर्जेदार PPE किट, N-95 मास्क, इतर साहित्य त्वरित मिळावे.
- कोविड ड्युटी नंतर परिचारिकांची स्वॅब टेस्ट करण्यात यावी.
- हृद्यरोग, मधुमेह, श्वसनसंस्थेचे आजार व इतर गंभीर आजार असलेल्या परिचारिकांना कोविड ड्युटीमध्ये सूट मिळावी.
- कोविड रुग्णास सेवा देतांना मृत्यू आल्यास शासनाने घोषित केलेली 50लाख रुपये विम्याची रक्कम त्वरित मिळावी तसेच वारसास शासकीय सेवेत नोकरी द्यावी.
- परिचारिका बाधित झाल्यास त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी रुग्णालयात उपचारासाठी राखीव जागा असाव्यात.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत कोविड रुग्णास सेवा देणाऱ्या परिचारिकांना 300 रुपये दैनंदिन भत्ता देण्यात येतो त्याप्रमाणे दैनंदिन भत्ता देण्यात यावा.
- कोविड सेवा देणाऱ्या परिचारिकांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी शासनाने विनाविलंब समिती गठित करावी.