हिंगोली : अज्ञात महिलेला बाळ झाल्याचा आनंद संपूर्ण रुग्णालय साजरा करत आहे. हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचारी पेढे वाटत आहेत, तर कुणी रांगोली काढत आहे. हे सारं पाहून आपल्याही चेहऱ्यावर आनंदाच्या छटा उमटतात. या साऱ्या आनंदोत्सवाची कहाणीही तशीच आगळीवेगळी आहे.

दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट. विस्कटलेले केसांची वेडसरपणे फिरणारी एक निराधार महिला हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात फिरत होती. तिला कुणीही आधार देत नव्हता. 8 महिन्यांची गरोदर असलेल्या या महिलेच्या अंगावर नीट कपडेही नव्हते. खायलाही वेळेवर मिलत नसल्याने अंगानेही ही महिला अशक्तच होती.

यावेळी रुग्णालयात निराधार रुग्णांना आधार देणारी परिचारिका आशा क्षीरसागर यांनी या अज्ञात महिलेला आदार दिला. तिला रुग्णालयात नेले आणि उपचारासाठी दाखल करुन घेतले. या महिलेचं नाव ‘गीता’ असे होते.

दोन महिने गीताची सर्व सेवा आशा क्षीरसागर यांनी केली. दरम्यान गीताच्या पोटीला मुलाचा जन्म झाला. याचा आनंद गीताच्या चेहऱ्यावर तर स्पष्टपणे दिसतोच, मात्र आशा क्षीरसागर, सविता कऱ्हाळे आणि रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरही दिसतो.

गीता ही काही पहिलीच नाही, याआधीही आशा क्षीरसागर यांनी अनेकांना मदत केली आहे. अनेक निराधार रुग्णांची आपुलकीने देखभाल करमाऱ्या आशार क्षीरसागर यांना आवडीने ‘माय’ म्हणून हाक मारली जाते.

आशा क्षीरसगार यांनी ज्या गीताला आधार दिला, त्या गीताचं कुटुंबंही असल्याचे नंतर लक्षात आले. एक मुलगी, आई, वडील, भाऊ, बहीण असं तिचं कुटुंबं आहे. नवरा मात्र पळून गेला होता. गरोदर असताना नवऱ्याच्या शोधात गीता हिंगोलीत आली. पण तिथेच तिची तब्येत खालावली. याचवेळी आशा क्षीरसागर यांनी तिला आधार दिला.

आशा क्षीरसागर यांचे आभार मानताना आणि त्यांच्याबद्दल बोलताना गीताचे डोळे पाणावतात.