Prophet Mohamamd Row Live : नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याविरोधात राज्यासह देशभरात आंदोलन, प्रत्येक अपडेट्ससाठी क्लिक करा

Nupur Sharma Controversy : नुपूर शर्मा यांनी प्रेषित पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याविरोधात आज राज्यभर आणि देशभरात मुस्लिम समजाकडून आंदोलन केलं जात आहे. त्याचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचा.

अभिजीत जाधव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 10 Jun 2022 07:23 PM
नुपूर शर्माच्या निषेधार्थ पनवेलमध्ये मुस्लिम बांधव रस्त्यावर

नुपूर शर्माच्या पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानानंतर देशासह विदेशातूनही जोरदार विरोध होत असताना पनवेल मधील मुस्लिम बांधवानी रस्त्यावर उतरून शर्मा यांचा निषेध केला. शुक्रवारच्या नमाजानंतर पनवेल मधील विविध मशिदीबाहेर मोठ्या संख्येने लोक जमा झाले. मुस्लीम बांधवांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत नुपूर शर्मा यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. नुपूर शर्मा यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्माने एका टीव्ही डिबेटमध्ये पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. यानंतर वाद अधिकच वाढला. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा अरब देशांनीही निषेध केला होता. यानंतर भाजपने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले.आंतराष्ट्रीय स्तरावर या वक्तव्यावरून भाजपाची नाचक्कि झाली आहे. परदेशात  विरोध होत असताना आता देशात देखील मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरू लागले आहेत.

यवतमाळमध्ये शहर ए मदिना सोशल फाउंडेशनकडून आंदोलन

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि नेत्यांकडून इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैंगबर यांच्याबद्दल अपमानास्पद विधान करण्यात आल्याचे पडसाद आता महाराष्ट्रभरात उमटत आहेत. यवतमाळच्या वणी येथील शहर ए मदिना सोशल फाउंडेशन व मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने त्या वादग्रस्त विधान करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी राष्ट्रपतींना करण्यात आली आहे. 

Belgaum : सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाकडून नुपूर शर्माच्या अटकेची मागणी
मोहम्मद पैगंबर यांच्याविषयच्या वक्तव्याबद्दल नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना अटक करून कारवाई करा अशी मागणी सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाने निदर्शने करून केली आहे. सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली आहेत. शेकडो कार्यकर्ते हातात झेंडा घेवून निदर्शनात सहभागी झाले होते. नुपूर शर्माला अटक करा,भाजप सरकारचा निषेध असो अशी जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली 
Aurangabad: गंगापूर तहसील कार्यालयावर एमआयएमचा मोर्चा

Protest: प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल भाजपच्या प्रवक्ते-नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ औरंगाबाद शहरात एमआयएमकडून काढण्यात आलेल्या मोर्च्याप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा आंदोलन करण्यात आले. गंगापूर तहसील कार्यालवर एमआयएमकडून भव्य असा मोर्चा काढण्यात आला. तसेच यावेळी वादग्रस्त विधान करणाऱ्या नुपूर शर्मा, राजा यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Shirdi News : शिर्डी येथेही मुस्लिम समाज आक्रमक

नुपूर शर्मा विरोधात महाराष्ट्रभर मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे. राहाता, शिर्डी, कोपरगावात मुस्लिम समाजकडून निदर्शने सुरु आहेत. नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल यांच्या अटकेची मागणी यावेळी केली जात आहे. मोहम्मद पैगंबरांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्यामुळे मुस्लिम समाज आक्रमक झाला असून पोलिसांना निवेदन देत शर्मा आणि जिंदाल यांच्या अटकेची मागणी केली जात आहे.

Jalna News : नुपूर शर्माच्या अटकेच्या मागणीसाठी हजारो मुस्लिम बांधव रस्त्यावर

जालन्यातील मामा चौक येथे ऑल इंडिया ईमाम कौन्सिलच्या वतीने नुपूर शर्मा यांना अटक करण्याच्या मागणी करण्यासाठी हजारो मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी मुस्लिम बांधवांनी भाजप तसेच नुपूर शर्मा विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. तसेच आंदोलकांनी नुपूर शर्माच्या अटकेची मागणी करत मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी करण्यात आली आहे.

Ranchi Cerfew : रांचीमध्ये तणावग्रस्त परिसरामध्ये कर्फ्यु जारी

Satara News : पोलिस ठाण्यासमोरील तणाव निवळला

भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्या बद्दल केलेल्या वक्त्याव्याचा सातारा मुस्लिम समाजाकडूनही निषेध सुरु असताना पोलिस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दरम्यान काही वेळातच गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर मुस्लिम समाजाची गर्दी कमी झाली आहे.

Sangli News : सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही मुस्लिम समाजाकडून निषेध 
भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्या बद्दल केलेल्या वक्त्यव्याचा सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम समाजाकडून निषेध करण्यात आला आहे. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज उपस्थित असून आक्षेपार्ह विधान करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या नेत्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे. 
सातारा शहर पोलिस ठाण्यासमोरही मोठया संख्येने मुस्लिम बांधव जमा

भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्या बद्दल केलेल्या वक्त्याव्याचा सातारा मुस्लिम समाजाकडूनही निषेध करण्यात येत आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचं काम सुरू असून सातारा शहर पोलिस ठाण्यात मोठया संख्येने मुस्लिम बांधव जमा झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण झाल्याचे पाहायला मिळाले.

परभणीतही मुस्लिम बांधव आक्रमक

मुस्लिम धर्मगुरू यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्या मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असुन या प्रकरणात भाजप प्रवक्त्या नुपुर शर्मा यांना केवळ पक्षातून काढून नाही तर त्यांना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी परभणीत आज समस्त मुस्लिम समाजबांधवांनी आपापली प्रतिष्ठान बंद ठेवून मोर्चा काढला.परभणी शहरातील अपना कॉर्नर पासुन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यन्त काढण्यात आला.शांततेत पार पडलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने मुस्लिम समाजबांधव सहभागी झाले होते.

दुसऱ्याच्या श्रद्धास्थानाचा कुणीही अनादर करु नये : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

महाराष्ट्राभर सुरु असलेल्या भाजपच्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्या विरोधातील मोर्चाबद्दल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना महाराष्ट्रभर पोलिसांचा बंदोबस्त असून कोणतीही हिंसक घटना घडलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच दुसऱ्याच्या श्रद्धास्थानाचा कुणीही अनादर करु नये असंही ते म्हणाले.

सोलापुरात एमआयएमच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजाचा भव्य मोर्चा

प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्याविषयी भाजपच्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्या विरोधात सोलापुरात हा भव्य मोर्चा एमआयएमच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला आहे. यावेळी नुपूर शर्मा यांना अटक करण्यात यावी अशी मागणी मोर्चेकरांनी केली आहे.

हावडामध्ये पोलिसांवर दगडफेक

Protest: कोलकाता आणि हावडा येथे नुपूर शर्माला अटक करण्याच्या मागणीसाठी निदर्शने झाली. यावेळी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. हावडा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलकांनी टायर जाळून निदर्शने केली. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना हटवले. अशा स्थितीत आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, त्यानंतर पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या सोडाव्या लागल्या. 


 

पार्श्वभूमी

मुंबई: सोलापूरमध्ये एमआयएमच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला असून प्रेषित पैगंबर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांना अटक करा अशी मागणी या मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे. सोलापूरसह अहमदनगरमध्येही मुस्लिम बांधवांकडून आज बंदची हाक देण्यात आली आहे. नुपूर शर्मांच्या अटकेच्या मागणीसाठी मुस्लिम बांधवांनी बंद पाळला..


नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर देशभरातून अनेक मुस्लिम संघटनांनी  त्याचा निषेध व्यक्त केला. त्याच पार्श्वभूमीवर आज सोलापुरात एमआयएमने भव्य मोर्चा काढला. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालसमोर मुस्लिम बांधवांनी प्रचंड मोठी गर्दी केली असून नुपूर शर्मा यांना अटक करा अशी मागणी करण्यात आली आहे. 


अहमदनगरमध्ये बंदची हाक
प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्याविषयी भाजपच्या नुपूर शर्मा यांनी  केलेल्या वक्तव्याविरोधात आज अहमदनगर जिल्ह्यात मुस्लिम बांधवांनी बंदची हाक दिली. नुपूर शर्मांच्या अटकेच्या मागणीसाठी मुस्लिम बांधवांनी बंद पाळला. हा 
बंद शांततेत पाळण्याचे मुस्लिम बांधवांचे आवाहन केलं होतं. देशात जातीय द्वेष भावना पसरणारे राजकारण बंद करण्याचे मुस्लिम बंधावांनी आवाहन केलं आहे. 


प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. भाजपने त्यांना पक्षातून निलंबितही केलं आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात विविध ठिकाणी 50 हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत.


एमआयकडून औरंगाबादेत आंदोलन; जलील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर 


भाजपच्या दोन प्रवक्ते-नेत्यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एमआयएमकडून आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी खासदार जलील सुद्धा उपस्थित असून, शेकडो कार्यकर्ते आंदोलनास्थळी जमा झाल्याने दिल्ली गेट परिसरात ट्राफिक पूर्णपणे जाम झाली आहे. तर घटनास्थळी खुद्द पोलीस आयुक्त दाखल झाले आहेत.


जालन्यातही आंदोलन
जालन्यातील मामा चौक येथे ऑल इंडिया ईमाम कौन्सिलच्या वतीने नुपूर शर्मा यांना अटक करण्याच्या मागणीसाठी हजारो मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी  मुस्लिम बांधवांनी भाजप तसेच नुपूर शर्मा विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच आंदोलकांनी नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी करत मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी केली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.