मुंबई : मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावरील बोरघाट हा या मार्गावरुन जाणाऱ्यांसाठी आता अतिधोकादायक ठरत आहे. बोरघाटातील वळण आणि उतार हे अनेकांच्या आयुष्यावर काळ होऊन घाला घालत आहेत. मागील काही दिवसांमध्ये अमृतांजन पूल, आडोशी बोगदा, ढेकू गावनजीकच्या परिसरात अपघातात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच नव्हे, तर २०१८ ते जानेवारी २०२१ दरम्यान बोरघाट परिसरात ६५ प्रवाशांचा मृत्यूही झाला आहे.


गेल्या काही दिवसापूर्वी मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर झालेल्या अपघातामध्ये नवी मुंबईतील डॉक्टर कुटुंब यांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातामध्ये अकरा वर्षीय मुलगा हा बचावला असून आई ,वडील, बहीण आणि आजी यांचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला आहे . यामुळे सगळ्यांच्याच मनाला एक चटका बसला आहे.  मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावरील ९४ किलोमीटरच्या टप्प्यामध्ये सर्वात धोकादायक ठरतोय तो म्हणजे बोरघाटातला उतार.


Special Report | कोरोनाला हरवलं, नियतीसमोर हरले; पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या कुटुंबावर काळाचा घाला


खालापूर ते बोरघाट लोणावळा दरम्यान असलेला सुमारे पंधरा किलोमीटरचा टप्पा हा जणू अपघातासाठी निमंत्रण ठरत आहे. गेल्या काही वर्षात या बोरघाटातील अपघातांचे प्रमाण पाहिलं तर या हद्दीत दर दिवसाआड अपघात झाल्याचं दिसून येतं. या मार्गावरील मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर असलेले अमृतांजन पूल, आडोशी बोगद्याजवळचे वळण, ढेकू गावानजीक असलेला उतार आणि तीव्र वळण हे मृत्यचे सापळे ठरत आहेत.


वाहनाची वेग मर्यादा पाळा....


दरम्यान , मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावरील बोरघाट हद्दीमध्ये वाहनांची वेग मर्यादा ही कारसाठी ५० किलोमीटर आणि अवजड वाहनांसाठी ४० किलोमीटर मर्यादित करण्यात आली आहे. परंतु, वाहनचालक वेग मर्यादेचे पालन करीत नसल्याने अपघात होत असल्याचे दिसून येत. यामुळे, गेल्या तीन वर्षांमध्ये २०१८ ते जानेवारी २०२१ पर्यंत मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावरील बोरघाट हद्दीमध्ये १३० अपघात झाले सुमारे ६५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यातच , यातील बहुतांश अपघात हे मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर असलेल्या घाटातील उतारावर  वाहनांवरील ताबा सुटल्याने झाले आहेत. यामध्ये, अतिधोकादायक ठिकाण म्हणजे खालापूर फोडमॉलजवळ असलेल्या ढेकू गावानजीकचा सुमारे तीन किलोमीटरचा टप्पा. या मार्गावर वळण आणि तीव्र उतार यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात.


बोरघाटातील मार्गावर नऊ अपघातप्रवण क्षेत्र असून अवजड वाहनांच्या हलगर्जीपणामुळे अनेक अपघात होत असल्याचे दिसून येत आहेत. यामध्ये, अनेक अवजड वाहन ही बोरघाटातील उतारावर गाडी चालवताना आपली वाहन ही बेशिस्तपणे चालवत असल्याने नियंत्रण मिळविणे कठीण जात असल्याने अपघात होतात. तर, छोटी वाहने देखील अतिवेगाने गाड्या चालवत असल्याने मल्टीवेहीकल अपघात होत असल्याने अनेकांचा मृत्यू होत आहे. यामुळे, गेल्यावर्षी २०२० मध्ये  बोरघाट हद्दीत झालेल्या अपघातात १८ आणि  २०१९ मध्ये २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.