जळगाव : महिलांच्या मंदिर प्रवेशासाठी राज्यव्यापी आंदोलन उभारणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आता ‘दारुमुक्त महाराष्ट्र’चा नारा दिला आहे. दारुबंदीसाठी राज्यभरात आंदोलन करणार असल्याची घोषणा तृप्ती देसाईंनी केला केली आहे. शिवाय, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी गावागावात ‘ताईगिरी’ पथकाची निर्मिती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दारुमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात. शिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही वाढत जात आहेत. त्यामुळे आपला समाज दारुमुक्त होण्याची गरज तृप्ती देसाई यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील गावो-गावी फिरत असताना दारुमुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या आमच्या लक्षात आल्याचेही त्यांनी सांगितले.

ज्यांनी ज्यांनी याआधी दारुमुक्तीसाठी आंदोलनं केली, अशा सर्वांना सोबत घेऊन मोठं आंदोलन उभं करणार आहोत. याची सुरुवात फेब्रुवारी अखेरीस पुण्यातून करणार असल्याची माहितीही तृप्ती देसाईंनी दिली.

चंद्रपूर जर दारुमुक्त होऊ शकतो, तर संपूर्ण महाराष्ट्र का नाही, असा सवाल तृप्ती देसाईंनी केला. “सरकारची इच्छ असेल, तर काही दिवसात महाराष्ट्र दारूमुक्त होऊ शकतो. त्यासाठी प्रत्येक पालकमंत्र्यांनी पुढाकार घायला हवा. मात्र, सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव दिसतो आहे. त्यामुळेच हे आंदोलन आम्ही करणार आहोत.”, असेही त्यांनी सांगितले.

सुरुवातीला गांधीगिरी मार्गाने आम्ही आंदोलन करणार असून, काहीच प्रतिसाद न मिळाल्यास आक्रमकपणे आंदोलन केले जाईल. मग सरकारलाही झुकावे लागेल, असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला.