शनी शिंगणापूर देवस्थान आता राज्य सरकारच्या नियंत्रणात
एबीपी माझा वेब टीम | 20 Jun 2018 05:45 PM (IST)
शनी शिंगणापूरला रोज साधारणपणे 40 ते 45 हजार भाविक येतात तर शनिवारी, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी साधारण एक ते सव्वा लाख भाविक येतात. शनी शिंगणापूर देवस्थानकडं 72 एकर जमीन आहे. यापैकी मंदिर सात एकर, इतर शेत जमीन आहे.
शनी शिंगणापूर (अहमदनगर) : भक्तांच्या साडेसातीचं विघ्न हाटवणारा, अशी शनी शिंगणापूरच्या शनी देवाची ख्याती आहे. मात्र आता हे देवस्थान राज्य सरकारनं ताब्यात घेतलं आहे. कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयावर आज शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे अगामी काळात शनी देवावर राजकारण्यांचा वरदहस्त राहणार आहे. देवस्थानच्या कारभारावर भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्याचबरोबर ग्रामसभेनं ठराव करुन विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची मागणीही केली होती. या प्रकरणी सरकारनं समिती गठीत केली होती. या समितीच्या अहवालानुसार देवस्थान ताब्यात घेण्याचा सरकारनं निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं राजकीय महत्वकांक्षेतून हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. देवस्थानवर राजकीय अंकुश राहणार असल्यानं विकास आणि पारदर्शक कारभाराकडं लक्ष असणार आहे. मात्र सरकारच्या या निर्णयानं गावकऱ्यांमध्ये ‘कही खुशी कही गम’ची भावना आहे. श्री शनैश्वर देवस्थानची घटना श्री शनी देवस्थानच्या घटनेनुसार शनी शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती करण्यात येते. शनी शिंगणापूरचा मूळ रहिवासी हा विश्वस्त होण्यास पात्र आहे. याबाबत संस्थानचे दिवंगत संस्थापक अध्यक्ष बाबूराव बानकर यांनी 2000 साली घटनेत विशेष तरतूद करुन घेतली. अहमदनगर सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी 27/2000 या आदेशानुसार मंजुरी दिली आहे. तेव्हापासून आजपर्यंत देवस्थानचा विश्वस्त शिंगणापूरचा मूळ रहिवासी राहिला आहे. श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त संख्या श्री शनैश्वर देवस्थानचं अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह 11 विश्वस्त आहे. सध्या देवस्थानच्या विश्वस्त मंडळात अध्यक्षासह दोन महिला आणि नऊ पुरुष आहे. अनिता शेटे या देवस्थानच्या विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्ष नानासाहेब बानकर आहेत. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या शनी चौथऱ्यावर महिलांच्या प्रवेशासाठी आंदोलन छेडलं होतं. यानंतर 2016 साली प्रथमच विश्वस्त मंडळात दोन महिलांना संधी मिळाली तर शेटे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. अहमदनगर शनी शिंगणापूर देवस्थान माहिती शनी शिंगणापूरला रोज साधारणपणे 40 ते 45 हजार भाविक येतात तर शनिवारी, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी साधारण एक ते सव्वा लाख भाविक येतात. शनी शिंगणापूर देवस्थानकडं 72 एकर जमीन आहे. यापैकी मंदिर सात एकर, इतर शेत जमीन आहे. शनी शिंगणापूर देवस्थानचं साठ खाटांचं रुग्णालय आहे. शंभर गायांची गोशाळा आहे. पाचवे ते दहावी पर्यत शनैश्वर माध्यमिक विद्यालय आहे. 80 ते 100 गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह मोफत शिक्षणाची सोय, पंढरपूरला देवस्थान मालकीचा शनी मठ आहे, साधारण एक एकर जागेत हा मठ आहे. मंदिर परिसरात एक हजार यात्रेकरुंसाठी राहण्याचं भक्त निवास आहे. तीन भक्त निवास असून एक हजार भाविक राहू शकतात तर सातशे भावीक एकाचवेळी जेवण करतील एवढा भोजन कक्ष आहे. भाविकांसाठी तीन एकरात पार्किंग व्यवस्था आणि स्वच्छतागृह आहे. शनी शिंगणापूर देवस्थानला देणगी आणि 66 शॉपिंग सेंटर भाडं, प्रसाद आणि तेल विक्री उत्पन्नाचे साधन वर्षिक उलाढाल 20 ते 22 कोटी आहे. गेल्या वर्षी तेलाचं लिलाव साधारणपणे दीड कोटीला गेला आहे. शनी शिंगणापूर दर सोमवारी दानपात्र मोजणी होते. दहा ते अठरा लाख आठवड्याला येतात. शनी शिंगणापूर देवस्थानकडं साडे तीनशे ते चारशे कर्मचारी आहेत। यावर साधारण 35 ते 40 लाख प्रती महिन्याला खर्च येतो.