पिंपरी :  प्रचार कसा करायचा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांकडून शिका, असं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं. संपर्कात कसं राहावं, प्रचार कसा करावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवकांचे काही गुण आत्मसात करायला हवे, असा सूर पवारांच्या बोलण्यात होता.

आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हाफ चड्डीवाले म्हणून हिणवणारे शरद पवार सर्वांनाच परिचित आहेत. मात्र संघाच्या प्रेमात पडलेल्या शरद पवारांचं आज पहिल्यांदाच दर्शन झालं. मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या पराभवानंतर शरद पवारांनी पहिल्यांदाच पिंपरीतल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.

मतदारसंघातल्या प्रत्येक घराशी दैनंदिन संबंध ठेवण्याचं टार्गेट, संघासाठी आणि पर्यायाने भाजपसाठी काम करणाऱ्या प्रचारकांनी ठेवलं. प्रचाराच्या या पॅटर्नमुळेच ठिकठिकाणी सत्तेचं कमळ फुलताना दिसत आहे. आता संघाच्या प्रचाराचा पॅटर्न पवारांच्या राष्ट्रवादीला यश मिळवून देणार की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

शपथविधीचा विषय संपवा

शपथविधीवेळी पाचव्या रांगेचा विषय मोठा नाही, त्यामुळे तो वाद संपवा, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. माझ्या सचिवांनी दोन वेळा विचारणा केली होती, मात्र संबंधित कार्यालयाने पाचवीच रांग असल्याचं म्हटलं होतं, असा पुनरुच्चार शरद पवारांनी केला. एकतर राष्ट्रपती भवन कार्यालयात किंवा आमच्या कार्यालयात त्रुटी असावी, असं पवार म्हणाले.

मोदींच्या शपथविधी सोहळ्यात पवारांचा अवमान नाही, गैरसमज!

आसनव्यवस्थेवरुन पवारांचा अवमान  नसून गैरसमज झाल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रपती भवनातून देण्यात आलं होतं. व्ही हे अक्षर रोमन लिपीतील पाचव्या रांगेचं निदर्शक नव्हतं. तर व्हीआयपीसाठी वापरण्यात आलेला तो कोड होता, असा दावा करण्यात आला होता.

VIDEO | मोदींच्या शपथविधीच्या रांगेचा विषय मोठा नाही, तो वाद संपवा : शरद पवार