मुंबई : 31 डिसेंबरला दारु पिऊन झिंगणाऱ्या तळीरामांची नशा उतरवण्यासाठी राज्य सरकारने नवा उतारा शोधला आहे. 31 डिसेंबरला एका दिवसाचा दारु परवाना न देण्याचे आदेश राज्य सरकारने महसूल खात्याला दिले आहेत.
महामार्गापासून 500 मीटरच्या परिसरात मद्याचा वापर करता येणार नाही, असा आदेश उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे. त्यामुळे थर्टी फर्स्टला पार्ट्यांचा बेत आखणाऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे. परिणामी, अनेकांना शहाराबाहेरचा रस्ता धरावा लागणार आहे.
देशभरातील अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर मद्यविक्रीला बंदी घातली आहे. याचा निर्णयाचा परिणाम म्हणून राज्यानेही शहरातील दारु पार्ट्यांवर निर्बंध घातले आहेत.
हौसिंग सोसायटी, बँक्वेट हॉल तसंच खुल्या मैदानावर थर्टी फर्स्ट डिसेंबरची पार्टी आयोजित करण्याच्या विचारात असणाऱ्यांचा प्लॅन सरकारच्या निर्णयामुळे बारगळणार आहे.