नोटाबदली रॅकेटशी संबंध नाही, माध्यमांनी पराचा कावळा केला : महंत सुधीरदास
एबीपी माझा वेब टीम | 13 Dec 2016 05:59 PM (IST)
नाशिक : नाशिकमध्ये जुन्या नोटा बदलून दिल्याच्या आरोपानंतर महंत सुधीरदास आणि छावाचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर पहिल्यांदाच 'एबीपी माझा' समोर आले आहेत. आयकर विभागाने आजही या दोघांची चार तास चौकशी केली. पैसे बदलून देणाऱ्या रॅकेटशी कोणताही संबंध नाही. माध्यमांनी पराचा कावळा केला, असा दावा महंत सुधीरदास यांनी केला आहे. आयकर विभागाने फक्त साक्षीदार म्हणून बोलवलं होतं, असंही चे म्हणाले. काय आहे प्रकरण? नाशिकजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर इंदिरानगर परिसरातील साईछाया या नामांकित हॉटेलमध्ये एक प्रसिद्ध व्यापारी, राजकीय महंत सुधीरदास आणि छावा संघटनेचा जिल्हाध्यक्ष विलास पांगारकर नोटाबदलीसाठी भेटणार असल्याची टीप आयकर विभागाला मिळाली. त्यानुसार आयकरच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि आणि मध्यरात्रीच तिघांना ताब्यात घेतलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन बॅगा भरुन नोटा सापडल्याचं कळतंय. इतकंच नव्हे तर नोटा मोजण्यासाठी आणलेलं मशीन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. पण या तिघांकडून नेमक्या किती जुन्या आणि किती नव्या नोटा जप्त झाल्या? चौकशीत या तिघांनी काय माहिती दिली हे सगळं अजूनही गुलदस्त्यात आहे.