Balasaheb Thorat : काही आमदारांनी पक्ष नेतृत्व सोनिया गांधी यांना भेटण्याची वेळ मागितली आहे. त्यात गैर काही नसल्याचे वक्तव्य महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केलं आहे. काँग्रेसमध्ये कोणीही नाराज नाही, मात्र त्या पत्राचा विपर्यास केला गेल्याचे थोरात म्हणाले. देशाचं नेतृत्व हे काँग्रेसच करु शकते, हे ज्यांनी मागणी केलीय त्यानांही माहिती आहे. सध्या काँग्रेसचा थोडा कठीण काळ सुरु असल्याचे थोरात यांनी यावेळी सांगितले.


सोनिया गांधी या यूपीएचं सक्षम नेतृत्व आहे. काँग्रेस हा देशपातळीवर सर्वदूर पसरलेला एकमेव पक्ष असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. महागाई कमी करु म्हणणारे आता कुठे लपलेत, असा टोलाही थोरात यांनी भाजपला लगावला. रुपया वाढला तेव्हा ते आंदोलन करत होते, आता तेकुठे गेलेत असेही थोरात म्हणाले.


महाविकास आघाडीतील काँग्रेस आमदारांचा एक मोठा गट नाराज असल्याची चर्चा सुरु आहेत. या नेत्यांनी पत्र लिहून काँग्रेस हायकमांडकडे भेटीची वेळ मागितल्याचे सांगितले जात होते. काँग्रेसच्या या नाराज आमदारांचे पत्र अखेर समोर आले आहे. हे पत्र पुण्यातील काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या लेटरहेडवरुन लिहण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसमधील नाराज आमदारांच्या गटाचे नेतृत्त्व संग्राम थोपटे हे करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सोनिया गांधी यांना पाठवलेल्या या पत्रावर एकूण 20 आमदारांच्या सह्या आहेत. या आमदारांनी 3 किंवा 4 एप्रिलला सोनिया गांधी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. काँग्रेसच आमदारांच्या या पत्रामुळे काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरु आहे. यावर मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस आमदारामध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचे थोरात म्हणालेत.


महत्त्वाच्या बातम्या: