Kolhapur Crime : कधी पोलिस असल्याचे सांगून, तर कधी आयकर अधिकारी असल्याचे सांगून, तर कधी बँकेतून बोलत असल्याचे सांगून अनेकांना लुटल्याच्या बातम्या नेहमीच कानावर येत असतात. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात एक भलत्याच कटाचा उलघडा झाला आहे. आयकर अधिकारी असल्याचे सांगून सांगलीतील सराफाचे कोल्हापुरात 80 लाख लुटल्याच्या प्रकरणातून धक्कादायक खुलासा झाल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. एखाद्या चित्रपटाच्या कथेला सुद्धा लाजवेल, असा हा प्रकार आहे.


गांधीनगर येथील धनाजी मगर यांची 80 लाख रूपयांची रोकड लुटणाऱ्या 7 आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुकुमार चव्हाण, संजय शिंदे, राहुल मोरबाळे, राहुल कांबळे, पोपट चव्हाण, जगन्मान सावंत, रमेश सोनार अशी संशयितांची नावे आहेत, तर दोघे फरार आहेत. पोलिसांनी 17 लाख 60 हजार रोख रक्कम, 3 मोटारसायकली मोबाईल व इतर साहित्य असा सुमारे 19 लाख 28 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 


फिर्यादीने रक्कम वाढवून सांगितल्याचा संशय 


दुसरीकडे लूट झाल्यानंतर फिर्यादीने रक्कम वाढवून सांगितल्याचा पोलिसांना संशय आहे. तपास तसेच ताब्यात घेतलेल्या 7 आरोपींना पुढील तपासासाठी शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांनी दिली आहे. 


असा रचला गेला कट 


संशयितांमधील संजय शिंदेला हवाला रॅकेटचा संशय आला होता. त्यामुळे तो त्याची तक्रार देण्यासाठी आयकर विभागाकडे गेला होता. त्यानंतर त्याने पोलिसांकडेही तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही ठिकाणी प्रतिसाद न मिळाल्याने संजयने ही रक्कम लुटण्याचा प्लॅन केला. संजयने प्लॅन यशस्वी करण्यासाठी त्याने गरजू लोकांची टीम तयार केली. यामध्ये हवाला व्यवहार करणाऱ्या मालकाचे दोन नोकरही सहभागी करून घेतले.  


मुक्तसैनिक वसाहतजवळ लुटले


कटात सामील असणाऱ्या चौघांनी मुक्तसैनिक वसाहतजवळ पैसे घेऊन येणाऱ्या धनाजी मगरला दम देत डिकीतील रक्कम पाहून चौकशी करायची आहे, असे सांगून ते शिरोली एमआयडीसीच्या दिशेने घेऊन गेले. त्याच्याकडील पैशांची बॅग हिसकावून घेत मगरला सांगली फाट्यावर सोडून फरार झाले होते. आयकर अधिकारी असल्याचे भासवून ही लूट करण्यात आली होती. त्यानंतर याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. लुटीची रक्कम मोठी असल्याने पोलिसांना पाळत ठेवून हा प्रकार झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तपासासाठी विविध पथके रवाना केली होती. 


मै करोडो मे सोता हूं तू क्या करेगा! 


कटातील संशयित आरोपी संजय शिंदे आणि हवाल्याचे काम करत असलेल्या व्यावसायिक व्यक्तीमध्ये कट रचण्यापूर्वी संवाद झाला होता. यावेळी हवालात सामील असलेल्या व्यावसायिक व्यक्तीने मै करोडो मे सोता हूं तू क्या करेगा! असे म्हटले होते. त्यानंतर संजयने तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दाद न घेतल्याने त्यानेच कट रचला.  लुटीमधील एकाही संशयित आरोपीचे कुठल्याही गुन्हेगारीचे रेकॉर्ड नाही. केवळ पैशांची गरज आणि हवाल्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला धडा शिकवायचा म्हणून ही लुट केली होती. मात्र, कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या