रायगड : नववर्ष साजरं करायला जाणाऱ्या पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना 29 ते 31 डिसेंबरदरम्यान बंदी घालण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तसे आदेशही जारी केले आहेत.


न्यू इअर सेलिब्रेशनसाठी अनेक जण मुंबईबाहेर जाण्याचा प्लॅन करतात. अशावेळी जड वाहनांमुळे प्रचंड गर्दीचा, ट्रॅफिक जामचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागतो. हे टाळण्यासाठी अवजड वाहनांना मुंबई-गोवा महामार्गावर 3 दिवस नो एन्ट्री असणार आहे.

नाताळ आणि विकेंड निमित्त कोकणात आणि पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले होते. यावेळी, मुंबई गोवा हायवेवरील पेण, वडखळ, माणगावदरम्यान वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. तर, मुंबई -पुणे एक्सप्रेस मार्गावर खोपोली आणि बोरघाट परिसरात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तर, मुरुड नजीकच्या काशिद किनाऱ्यालगतच्या मार्गावर सुमारे 10 ते 12 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

दरम्यान, वाहतूक कोंडीच्या या गैरसोयीमुळे नववर्ष निमित्त कोकण आणि पुण्याच्या दिशेन जाणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी 29 ते 31 डिसेंबर दरम्यान जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

यासाठी, जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी सर्व संबंधित विभागांची तात्काळ बैठक बोलावून पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणारे महामार्गावरील खड्डे तात्काळ बुजवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

याप्रमाणेच समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सागरी किनाऱ्यांवर जीवरक्षकांची पथके तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.