मुंबई : गणपती ही खरं तर बुद्धीची देवता... पण बहुदा 11 दिवसांच्या मुक्कामातही पुण्यातल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बाप्पा बुद्धी देऊ शकले नाहीत. समाधानाची गोष्ट हीच की मुंबईतल्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना बाप्पा पावल्याचं दिसत आहे. ही तुलना करण्याचं कारण म्हणजे न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही पुण्यात डीजेचा दणदणाट यंदाही कायम राहिला, तर मुंबईतील बहुतांश गणेशोत्सव मंडळांनी डीजेला फाटा दिला. मुंबईतल्या मोठमोठ्या मंडळांनी जी सजगता, समजूतदारपणा दाखवला, तो पुण्यातल्या अतिउत्साही मंडळांनी का दाखवला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यंदा मुंबई उच्च न्यायालयाने आणि राज्य सरकारने डीजेच्या दणदणाटावर बंदी घातलेली असतानाही पुण्यातल्या काही आडमुठ्या मंडळांनी आपलं तुणतुणं डीजेसह वाजवलंच. मंडळातल्या कार्यकर्त्यांसोबत पोलिसांच्या बाबतीतही मुंबई पोलीस हे पुणे पोलिसांवर सरस ठरले आहेत. कारण डीजे वाजवणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याचं सोडून पुणे पोलीस फक्त पंचनामे करत बसले आहेत. या उलट मुंबई पोलिसांनी कुठेही डीजे वाजणार नाही, याची खबरदारी घेतल्याचं दिसत आहे. राज्यात अनेक ठिकाणी ढोल-ताशांसारखी पारंपरिक वाद्य वाजवत अनेक गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला. त्यामुळे दरवर्षी ध्वनी प्रदूषणाने कान किटणाऱ्या अनेक जणांनी समाधान व्यक्त केलं आहे. गेली दहा दिवस मनोभावे गणरायाची पूजा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. मुंबई-पुण्यासह राज्यभरात गणेशभक्तांच्या उपस्थितीत गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशा जयघोषात परिसर दुमदुमला. राज्यभरातील गणेशभक्तांनी डीजे-डॉल्बीमुक्त मिरवणुकांना प्राधान्य देणं निश्चितच स्वागतार्ह आहे. न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत डीजे-डॉल्बीचं 'विसर्जन' केल्यामुळे सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. उच्च न्यायालयाकडून डॉल्बीवर बंदीच

उच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यांवर डॉल्बीला परवानगी देण्यास स्पष्ट नकार दिला. डीजेबंदीला स्थगिती देण्याची पाला संघटनेची मागणी कोर्टाने फेटाळून लावली. या याचिकेवर अंतिम सुनावणी 4 आठवड्यांनी होणार आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बीच्या वापरावरील बंदी कायम आहे. मात्र या संदर्भात राज्य सरकारला चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिलेत.

ध्वनी प्रदूषणाची पातळी ओलांडणाऱ्या डीजेला सार्वजनिक ठिकाणी परवानगी देणं शक्य नाही. कारण डीजेची किमान पातळी हीच ध्वनी प्रदूषणाच्या कमाल मर्यादेच्या बाहेर आहे, असा दावा करत राज्य सरकारानं डीजे आणि डॉल्बी सिस्टिमला हायकोर्टात जोरदार विरोध केला होता. काही वेळेला एखाद्या गोष्टीवर बंदी घालणं हे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचाच एक भाग असतं, असं राज्य सरकारनं म्हटलं होतं.

पुण्यातील मंडळांचा हेका

गणपती विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार टाकणाऱ्या मंडळांनी गणपती मंडपामधेच ठेवण्याचा निर्णय घेतला. डॉल्बीमुक्त मिरवणुकीसाठी पोलिस आग्रही असताना या मंडळांनी हेकेखोर भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विशेष अधिकारात डीजे वाजवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी या मंडळांकडून करण्यात आली होती.

नगरमध्येही 12 मानाच्या गणपती मंडळांचा बहिष्कार विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्यात परवानगी न मिळाल्याने अहमदनगरमधील 13 मानाच्या गणपतींपैकी 12 मानाच्या गणपती मंडळांनी गणपती विसर्जन मिरवणुकीवरच बहिष्कार टाकला आहे. मिरवणुकीत न्यायालयाने सांगीतल्याप्रमाणे 75 डेसिबलपेक्षा जास्त आवाज न करण्याचा शब्द या मंडळांनी पोलिसांना दिला. मात्र पोलिसांनी डीजे मिरवणुकीत आणला, तर कारवाई करु असा इशारा गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना दिला. त्यामुळे ऐनवेळी डीजे न वाजवता पारंपरिक वाद्य कुठून आणणार, असा प्रश्न गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसमोर उभा राहिला. म्हणून नाराज झालेल्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन हा निर्णय घेतला.