नवी दिल्ली : विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा माल किफायती दरात बांग्लादेश येथे निर्यात करता यावा, यासाठी विशेष किसान रेल सुरु करण्यात यावी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्य रेल्वेचे डीआरएम सोमेश कुमार, डीसीएम कृष्णा पाटील आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत आज दिनांक 12 सप्टेंबर 2020 रोजी बैठक घेतली.


विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बांग्लादेश ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. वार्षिक उत्पन्नाच्या दोन तृतीयांश सुमारे अडीच लाख टन संत्री दरवर्षी बांग्लादेश येथे निर्यात करण्यात येतात. मात्र थेट रेल्वेची सुविधा नसल्याने रस्त्याने संत्र्यांची मालवाहतूक होते. विदर्भातून बांग्लादेश पर्यंत रस्त्याने मालवाहतूक करताना साधारणत: 72 तास लागतात. जर किसान रेल्वे सुरु झाल्यास 36 तासात शेतकऱ्यांचा माल बांग्लादेशच्या बाजारात उपलब्ध होवू शकेल तसेच निर्यातीच्या खर्चामध्ये कपात होईल आणि त्यामुळे मालाची गुणवत्ता चांगली राहील.


रेल्वे विभागाने नितीन गडकरी यांच्या प्रस्तवाला हिरवा कंदील दाखविला असून लवकरच याचा रोडमॅप तयार करण्यात येईल, असे आश्वासन बैठकीत मध्य रेल्वेचे डीआरम सोमेश कुमार यांनी यावेळी दिले. ही विशेष किसान रेल साधारणतः वीस बोग्यांची आणि 460 टन माल वाहन नेण्याची क्षमतेची असेल. वरुड, नागपूर, काटोल, नरखेड या स्टेशनवरुन शेतकरी आपला माल या गाडीमधून पाठवू शकतील. यासाठी विशेष वेबसाईट तयार करुन शेतकऱ्याची आधीच बुकींग घेण्याची सूचना गडकरी यांनी बैठकीत केली. बांग्लादेश प्रमाणेच दिल्ली, मुंबई, बंगलोर, जयपूर सारख्या महानगरांना सुध्दा किसान रेलच्या माध्यमातून माल पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारानेच सुरेश प्रभू, यांनी वाणिज्य मंत्री असताना विदर्भात संत्री क्लस्टरला मान्यता दिली होती. ज्यामुळे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी आपला माल एकत्रित करुन विविध बाजारपेठेत पाठवू शकत आहे. किसान रेल्वे सुरु झाल्यास विदर्भातील कृषि अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होईल, अशी प्रतिकिया महाऑरेंजचे श्रीधरराव ठाकरे यांनी दिली.