नवी दिल्ली : साखरेचे दर 45 रुपये किलोच्या आत राहणार असतील तर यावर्षी साखरेची आयात होऊ देणार नाही, असं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं. साखर कारखानदारांच्या दिल्लीतल्या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी हे आश्वासन दिलं.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गडकरी हे या कार्यक्रमाला एकाच व्यासपीठावर होते. गडकरींचं भाषण संपल्यानंतर पवारांनी हातात माईक घेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरींनी हे आश्वासन दिलं.

ऊस उत्पादकतेच्या बाबतीत गुणवत्ता जपणाऱ्या देशभरातल्या विविध साखर कारखान्यांचा आज नॅशनल शुगर फेडरेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. देशात पुढच्या तीन वर्षात साखरेची गरज 300 लाख टनाने वाढणार आहे, त्यामुळे नव्या आव्हानांसाठी साखर उद्योगाने तयार राहण्याची गरज शरद पवारांनी बोलून दाखवली.

उसाचं प्रती हेक्टरी उत्पादन, रिकव्हरी याबाबतीत जगातल्या देशांशी स्पर्धा करावी लागेल, असं शरद पवार म्हणाले. तर साखर उद्योगाने भविष्यात साखरेपासून डिटर्जंट साबण, बांबूपासून सहवीजनिर्मिती या नव्या पर्यायांकडे वळलं पाहिजे, जेणेकरुन कारखाना वर्षभर चालू राहून त्याची क्षमता वाढेल, असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलं.

पाहा व्हिडिओ :