सांगली : महासभा कायदेशीर की बेकायदेशीर यावरुन सांगली महापालिकेत नगरसेवकांनी प्रचंड गोंधळ घातला. उपमहापौर गटाने तर राजदंड पळवून महासभा उधळून लावली. या सभेत गोंधळ घातल्यामुळे उपमहापौरांसह एका नगरसेवकांचं निलंबन करण्यात आलं. तर राजदंड पळवणाऱ्या उपमहापौरांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापौरांनी दिले.


महापालिकेची आजची सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप करत उपमहापौर विजय घाडगे, नगरसेवक शेखर माने यांच्यासह काही नगरसेवकांनी विरोध केला. यावेळी उपमहापौरांसह काही नगरसेवकांनी महापौरांना जाब विचारला. यामुळे महापालिकेच्या सभेत चांगलाच गोंधळ झाला.

महापौर हारून शिकलगार यांनी सर्व नगरसेवकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. मात्र सभेत गोंधळ वाढला. यावेळी उपमहापौर विजय घाडगे, नगरसेवक शेखर माने, अश्विनी कांबळे यांनी महापौर आणि पिठासनासमोर ठाण मांडलं. यामुळे सत्ताधारी नगरसेवकांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं.

हा गोंधळ वाढतच चालल्याने शेवटी नगरसेवक शेखर माने यांनी पिठासनासमोरील राजदंडच पळवून नेल्याने सभा रद्द करण्याची वेळ सत्ताधारी गटावर आली. हा गोंधळ घातल्यामुळे उपमहापौर विजय घाडगे आणि नगरसेवक शेखर माने यांना महापौरांनी निलंबित केलं. तसेच राजदंड पळवल्याबद्दल दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.