नागपूर : काँग्रेसचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी रामदेव बाबांच्या पतंजली फूडला दिलेल्या जमिनीवरुन केलेल्या आरोपांना, आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिलं.


पतंजली फूडला दिलेली जागा ही सेझबाहेर असून, निविदा काढून नियमाप्रमाणेच जागा दिल्याचं गडकरींनी म्हटलंय.

तसंच आधीच्या सरकारने मिहानमध्ये रोजगार निर्मितीसाठी काय केले. त्यांचे, त्या तीनपाट नेत्याचं नावही घेणार नाही. उगीच त्या विघ्नसंतोषी नेत्यांना महत्व मिळते, असं म्हणत गडकरींनी मुत्तेमवारांवर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला.

 

गडकरींचा मुत्तेमवारांवर निशाणा

"रामदेव बाबांना दिलेली जागा अविकसित आहे. इथे पाणी, वीज नाही. ही जागा 'सेझ'च्या बाहेर आहे. सर्व जागा निविदा काढून नियमाप्रमाणे प्रति एकर 25 लाखाचे दर घेतले. रामदेव बाबांनी सेझमध्येही 60 एकर जागा मागितली. त्यासाठी आजच 10 कोटीचे चेक दिले", असं गडकरी म्हणाले.

"इथे काही विघ्नसंतोषी नेते आहेत. जे आयुष्यभर स्वतः काही करु शकले नाही. त्यांनी आयुष्यभर फक्त स्वतःच्या मुलाच्या रोजगाराची काळजी घेतली. पण रामदेवबाबांच्या फूडपार्कमध्ये 50 हजार लोकांना रोजगार मिळेल" असंही गडकरींनी नमूद केलं.

 

विलास मुत्तेमवार यांचा आरोप


‘नागपूरच्या मिहान प्रकल्पातली जमीन रामदेव बाबांच्या पतंजलीला विकल्याप्रकरणी सीबीआय चौकशी करावी.’  अशी मागणी विदर्भातील काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार यांनी केली. सरकारने रामदेव बाबांना कवडीमोल भावात जमीन दिल्याचा आरोप, मुत्तेमवार यांनी केला.

सबका साथ नव्हे तर भाजपला साथ, रामदेव बाबांचा विकास आहे. केवळ रामदेवबाबालाच जमीन का दिली, इतर लोकांच्या निविदा का मागवल्या नाही, असा सवाल मुत्तेमवार यांनी केला होता.