नागपूर : जो अधिकारी तीन दिवसात एक फाईल पूर्ण करणार नाही, त्याला थेट घरी पाठवा. अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे प्रकल्प प्रलंबित राहतात, असे खडेबोल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना सुनावले आहेत.


नितीन गडकरी यांनी नागपूर महापालिकेतील दिरंगाईबाज अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं. काम न करणाऱ्या, दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी पाठवलं जाईल, असं गडकरींनी म्हटलं आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

काय आहे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प?

वीज निर्मितीसाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा नागपुरात पार पडला. 130 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता नागपुरातल्या भांडेवाडी परिसरातल्या या प्रकल्पात आहे.

या प्रकल्पात सांडपाण्य़ावर प्रक्रिया झालेलं पाणी कोराडीच्या औष्णिक वीज केंद्रात नेण्यात येईल आणि या पाण्याद्वारे वीज निर्मिती केली जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडला.

नागपूरच्याच धर्तीवर आता परळीतलं औष्णिक वीज केंद्र हे नांदेड शहरातील प्रक्रिया केलेल्या सांडपाण्यावर चालेल. तर सोलापुरातील एनटीपीसी वीज केंद्रही अशाच प्रकारे चालवले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारे वीजनिर्मिती करणारं नागपूर जिल्ह्यातला हा देशातला पहिला प्रकल्प आहे.