जळगाव : राज्यात मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी, बेरोजगारी आदी मुद्द्यांवरुन भाजपविरोधी वातावरण तयार झालं असताना, जळगाव महापालिका निवडणुकीचे धक्कादायक निकाल हाती आले आहेत. जळगाव महापालिकेत भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवत सुरेश जैन यांची सद्दी संपवल्याचं पाहायला मिळत आहे. जळगाव महापालिकेत तब्बल 40 वर्षानंतर जळगाव महापालिकेतील सुरेश जैन गटाचं वर्चस्व संपलं आहे. भाजपने जळगाव महापालिकेच्या 75 पैकी 57 जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेला 15 आणि एमआयएमला 3 जागा मिळवता आल्या. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही.
एकनाथ खडसेंच्या बालेकिल्लात गिरीश महाजनांची जादू चालली आहे. पण वर्षभरात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी महापालिका कर्जमुक्त करण्याचं आणि जळगाव स्वच्छ सुंदर करण्याचं आव्हानही गिरीश महाजन यांना पेलावं लागेल.
गेल्यावेळी तुरुंगातून निवडणूक जिंकणाऱ्या सुरेश जैन यांना जळगावकरांनी हद्दपार केल्याची अनेक कारणं आहेत.
- जैनांच्या काळात केवळ हुडकोचं कर्ज 700 कोटीच्या घरात पोहोचलं.
- कचऱ्याच्या प्रश्नाने गंभीर स्वरुप धारण केलं, शहर बकाल होत गेलं
- अतिक्रमणांनी रस्ते अरुंद होत गेले, खड्ड्यांनी शहराचं कंबरडं मोडलं
- शहरात फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर झाला, भाड्याने दिलेल्या गाळ्यांचं नुतनीकरण झालं नाही
- सत्तेत वाटेकरी राहिलेले मनसेचे नगरसेवक आणि महापौर ललित कोल्हे भाजपच्या गळाला लागले
- घरकुल घोटाळ्याप्रकरणामुळे जैनांची भ्रष्टाचारी नेता म्हणून झालेली इमेज त्यांना पुसता आली नाही
आत्मचिंतन करु : सुरेश जैन
सुरेश जैनांनी आयुष्यभर आक्रमक राजकारण केलं. अण्णा हजारेंनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर जैन यांनी त्यांनाही कोर्टात खेचलं. मात्र भाजपकडून दारुण पराभव झाल्यानंतरही आज सुरेश जैन फार काही बोलले नाहीत. पराभव मान्य असून आत्मचिंतन करु, अशी प्रतिक्रिया सुरेश जैन यांनी दिली आहे.
जैनांना तयारीसाठी मिळाला नाही
जैन कुठल्याही पक्षात राहिले तरी जळगावचं राजकारण त्यांनी खान्देश विकास आघाडीच्या माध्यमातून केलं. मात्र तुरुंगातून सुटल्यानंतर जैनांना शिवसेनेने पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढण्यास भाग पाडलं. तसं सुरेश जैन आणि गिरीश महाजनांचं सख्य जिल्ह्याला ठावूक होतं. अँटी इन्कबन्सी पाहता सुरेश जैनांनी शेवटपर्यंत भाजपशी हातमिळवणीचे प्रयत्न केले. जे खडसेंच्या गटाने हाणून पाडले आणि त्यामुळे सुरेश जैनांना तयारीसाठी वेळ मिळाला नसल्याचंही राजकीय निरीक्षक सांगतात.
एकनाथ खडसेंना चेक
उत्तर महाराष्ट्रात एकनाथ खडसेंचा शब्द चालायचा. जळगावात तर त्यांच्याशिवाय पानही हालत नव्हतं. पण खडसेंचं मुख्यमंत्र्यांशी बिनसलं. त्यानंतर फडणवीसांनी गिरीश महाजनांना ताकद दिली आणि जळगावच्या विजयाच्या रुपाने हा एकनाथ खडसेंना दिलेला मोठा चेक मानला जात आहे.
जळगावात जैन विरुद्ध भाजप अशी निवडणूक होती. शहराची वाट लावल्याने लोकं संतापात होते. त्यामुळे राज्यात सध्या सुरु असलेल्या एकाही आंदोलनाचा परिणाम निवडणुकीत दिसला नाही. भाजपची महापालिकेची टॅली दोनने वाढली आणि ही बाब मुख्यमंत्र्यांचा आणि भाजप नेत्यांचा कॉन्फिडन्स वाढवणारी आहे.
जळगाव महापालिकेतील पक्षनिहाय आकडेवारी
भाजप - 57
शिवसेना - 15
एमआयएम - 03
काँग्रेस-राष्ट्रवादी - 0
एकूण - 75
जळगाव निकाल : महाजन यांची जादू, सुरेश जैन यांची सत्ता उलथवली!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Aug 2018 04:27 PM (IST)
एकनाथ खडसेंच्या बालेकिल्लात गिरीश महाजनांची जादू चालली आहे. पण वर्षभरात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी महापालिका कर्जमुक्त करण्याचं आणि जळगाव स्वच्छ सुंदर करण्याचं आव्हानही गिरीश महाजन यांना पेलावं लागेल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -