मुंबई : मुंबईतील सोफिया महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीला आयपॅडवर बारावीची परीक्षा देण्यास महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाने परवानगी दिली आहे. निशका नरेश हसनगडी, असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. ही विद्यार्थिनी दिव्यांग अध्ययन अक्षम असल्याने तिला आयपॅडवर परीक्षा देण्यास परवानगी देण्यात आली आहे.

राज्यभरात उद्यापासून (21 फेब्रुवारी) 12 वीची परीक्षा सुरु होणार आहे. मुंबईतील सोफिया महाविद्यालयातील  विद्यार्थिनी निशका हसनगडी ही (दिव्यांग) अध्ययन अक्षम आहे. निकशाला लहानपणापासून इतर विद्यार्थ्यांप्रमाणे हातात पेन पेन्सिल घेऊन लिहता येत नाही. त्यामुळे तिच्यावतीने आयपॅडवर परीक्षा देण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. शिक्षण बोर्डाने या मागणीला मान्यता दिली असून एक लेखनीक आयपॅडवर टाइप केलेले उत्तर उतरपत्रिकेवर लिहणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ मंडळांमार्फत बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2019 या कालावधीत परीक्षा होणार आहेत. या परीक्षेसाठी राज्यभरातून 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 8 लाख 42 हजार 919 विद्यार्थी तर 6 लाख 48,151 विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत.

कला, वाणिज्य, विज्ञान व किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम या सर्व विभागाचे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. राज्यात 2957 परीक्षा केंद्रे आहेत. यावर्षी सर्व विभागात विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉलतिकीट मिळणार आहेत. तसेच पीसीएमबी अर्थात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे.