मुंबई : बैलपोळा राज्यभरातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. पण हा सण साजरा करताना अनेक ठिकाणी याला गालबोटही लागलं. बैल धुण्यासाठी पाण्यात गेलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना विविध ठिकाणी घडली. राज्यभरात नऊ तरुणांनी आपला जीव गमावला.
औरंगाबाद जिल्ह्यात आज वेगवेगळ्या चार गावात पोळा सणानिमित्त बैल धूत असताना सहा मुलांचा जलसाठ्यामध्ये बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे.
अकोला जिल्ह्यात रविवारी सकाळी बार्शी टाकळी तालुक्यातील चिचखेड येथील ईसापूर नावाने ओळखल्या जाणाऱ्या धरणात बैल धुण्यासाठी गेलेला युवक बुडाला. गौरव संतोष एकणार असं त्या युवकाचं नाव आहे. गौरव आज सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान बैल धुण्यासाठी गेला. मात्र पाणी खोल असल्याने तो बुडाला असल्याची माहिती पिंजर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर नागलकर यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात बैल धुण्यासाठी गेलेला 17 वर्षीय तरुण पाटाच्या पाण्यात वाहून गेला. येवला तालुक्यातील पाटोदा येथील घटना आहे. गोकुळ तनपुरे असं या युवकाचं नाव असून तो अकरावीत शिकत होता.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील माळवटा येथे पोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. विशाल ठोंबरे (17) असं मृत तरूणाचं नाव असून माळवटा गावातील आसना नदी पात्रात तो आज सकाळी बैल धुण्यासाठी गेला होता.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात मोठी दुर्घटना टळली. अर्धमासला गावचे किसन राऊत हे मानाचा बैल घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालत असताना अचानक पाठीमागून येणारे बैल जोरात धावले आणि त्यात अडकून किसन राऊत खाली पडले. यावेळी त्यांच्या अंगावरून काही बैल गेल्याने ते गंभीर जखमी झाले. प्रसंगावधान राखून त्या ठिकाणच्या लोकांनी त्यांना बाहेर ओढलं आणि जखमी अवस्थेत तात्काळ गेवराईच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्या डोक्याला इजा झाली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
राज्यात विविध ठिकाणी बैल धुण्यासाठी गेलेल्या नऊ तरुणांचा बुडून मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Sep 2018 10:05 PM (IST)
बैल धुण्यासाठी पाण्यात गेलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना विविध ठिकाणी घडली. राज्यभरात नऊ तरुणांनी आपला जीव गमावला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -