रायगड : तुम्ही माथेरानला गेल्यानंतर घोडेस्वारी करत असाल, तर काळजी घ्या. कारण, माथेरान येथे आई-वडिलांसोबत फिरायला गेलेली नऊ वर्षीय रशिदा घोड्यावरून पडल्याने गंभीर जखमी झाली आहे.


उन्हाळा वाढला की सर्वांचंच पाऊल हे थंड हवेच्या ठिकाणाकडे पडतं. मुंबईपासून अवघ्या तीन तासांच्या अंतरावर असलेलं माथेरान हे त्यापैकीच एक. शुक्रवारी मुंबई येथील 20 जणांचा ग्रुप माथेरानला फिरण्यासाठी तीन दिवसांच्या सहलीसाठी गेला होता.

यामध्ये हसन रेडीवाला हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत आले होते. शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हसन रेडीवाला हे त्यांची पत्नी आणि नऊ वर्षीय मुलगी रशिदा हे त्यांच्या ग्रुपसोबत घोडेस्वारी करण्यासाठी निघाले. याचवेळेस, अलेक्झांडर पॉईंटनजीक आले असता रशिदाचा घोडा बिथरला आणि ती घोड्यावरून खाली पडली.

रशिदाचा पाय हा घोड्याच्या रिकीबित अडकल्याने बिथरलेल्या घोड्याने तिला काही अंतरापर्यंत ओढत नेलं. यामुळे, रशिदाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला तातडीने मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं.