सोलापूर : देशात कोरोनाच्या प्रसारास पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यायत यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. कोरोना हा इंपोर्ट केलेला आजारा आहे. हे इंपोर्ट करण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले आरोपी आहेत. त्यामुळे ज्याच्या घरात कोव्हिड-19 मुळे कोणी दगावला असेल त्यांनी पंतप्रधानांवर 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला पाहिजे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला येणाऱ्या परदेशी नागरिकांना बंदी घालण्यात आली असती. मात्र तसे केले गेले नाही. त्यामुळे बाहेरुन आलेल्या या परदेशी नागरिकांनी कोरोनाचा प्रसार केला, असा घणाघणात प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.


सोलापुरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे सोलापुरात आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली. सोलापुरातील परिस्थिती संदर्भात आपल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देखील देण्यात आले. तत्पूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर गंभीर टीका देखील केली.


कोरोनापेक्षा जास्त लोक टीबीने दगावले होते. मात्र टीबीच्या वेळेस लॉकडाऊन झालं नव्हतं. कोरोनामुळे लॉकडाऊन झालं त्यामुळे अनेक जण उपाशी आहेत. अनेक श्रमिकांचे रोजगार बंद आहेत. कोरनाच्या निमित्ताने शासनाने सर्वसामान्य लोकांना ब्लॅकमेल केलं आहे. सर्वसामान्य लोकांचे जीवन उद्ध्वस्त केलंय. त्यामुळे 30 तारखेची वाट न बघता सामान्य आयुष्य जीवन जगायला सुरुवात करा, असे आवाहन देखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले. लॉकडाऊनमुळे अनेक लोक मानसिक रुग्ण झाले असल्याचे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.


तसेच कोरोनाच्या काळात जनजागृती करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या कॉलरट्यूनवरुन देखील प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधला."तीन महिने झाले मोबाईलवर कोरोनाची कॉलरट्यून वाजत आहे. या कॉलरट्यूनच्या माध्यमातून सर्वसामान्यात कोरोनाची रिंगटोन लावून भीती निर्माण केली जात आहे. 3 महिने झाले तरी रिंगटोन बदललं नाही. यामागे काय षडयंत्र आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगावं" असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.


केंद्र आणि राज्य सरकार भिकारी सरकार आहेत : प्रकाश आंबेडकर


गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. यावरुन देखील प्रकाश आंबडेकर यांनी जोरदार टीका केली. जगभरात तेलाच्या किंमती पडलेल्या असाताना देखील देशात मात्र पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत आहेत. ही नवीन प्रकारची चोरी असून, सरकार संघटीत गुन्हेगार आहेत. तसेच केंद्र आणि राज्य सरकार भिकारी असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत आपली प्रतिक्रिया देण्यास मात्र प्रकाश आंबेडकर यांनी टाळलं."मी दुसऱ्याच्या वक्तव्यावर का बोलू? ज्यावेळी मला वाटेल त्यावेळी मी बोलतो." अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी केली.


बेजबाबदार वक्तव्य करुन प्रकाश आंबेडकर राहुल गांधींच्या रांगेत उभे राहिले आहेत : मधु चव्हाण