Nilesh Rane on Shivsena : शिवसेना आणि राणे यांच्यातील शाब्दिक वाद पुन्हा एकदा सुरु झाला आहे. नारायण राणे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर हल्लाबोल केला. शिवसेना नेत्यांकडून याला प्रत्युत्तर देण्यात आले. या वादात आता माजी खासदार निलेश राणे यांनीही उडी घेतली आहे. निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला असून याच जन्मात सर्व हिशोब चुकते करणार आहे, असे वक्तव्य केलं आहे. 


माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. 'इतक्या खालच्या थराचे राजकारण महाराष्ट्रात आजपर्यंत कुणीही केले नव्हते, यापुढेही कुणी करेल असे वाटत नाही. ठाकरे हे विसरलेत की ते सातत्याने त्या खुर्चीवर बसायला आलेले नाहीत. आज खुर्ची तुमच्याकडे आहे, उद्या आमच्याकडे असेल हे लक्षात ठेवा. त्यामुळे हिशोब चुकते याच जन्मात करणार, सोडणार नाही, असे निलेश राणे म्हणाले. '


कुठल्या थराला जाऊन राजकारण करायचं याला मर्यादा असते. मात्र हे ठाकरे सरकार मर्यादा विसरले आहे. महाराष्ट्रातले बाकी सगळे प्रश्न सुटले, फक्त राणे आणि किरीट सोमय्या येवढच राहीले आहेत. लोक यांना आपटल्याशिवाय राहणार नाहीत. हे जे काही चालवलेय नोटीसीचं नाटक ते आज ना उद्या संपेल. कारण त्यात अनधिकृत काही नाही. अशा खूप तक्रारी आल्या आणि गेल्या.  राणेंच कोणी काही उखाडू शकले नाहीत आणि कधी उखडणार नाहीत. मात्र, आम्ही एक ना एक दिवस उखडायचं कोणाला म्हणतात. कसं उखडतात ते दाखवून देवू, असा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. 


राणेंनी आज शिवसेनेवर केलेले आरोप - 
बाळासाहेबांनी मराठी माणसांसाठी शिवसेना काढली. सध्याचे प्रमुख मराठी माणसाच्या मुळावर आले आहे, असे म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. मातोश्री पार्ट 2 बेकायदेशीर आहे. पैसे भरुन बांधकामाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. माझ्याकडे त्यांच्या दोन्ही घरांचे प्लॅन असल्याचे राणे म्हणाले. महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांची काय स्थिती आहे. उत्पन्न काय वाढले का? कायदा सुव्यस्था नाही. बेकारी वाढली आहे आणि हे म्हणतात मराठी माणसासाठी शिवसेना. मराठी माणूस मुंबईतून तडीपार झाला आहे. मराठी माणसांसाठी तुम्ही काय केले. उद्योग, रोजगार दिले का? असा सवाल देखील राणेंनी शिवसेनेला केला. हे विकासाचे काहीच बोलत नाहीत. म्हणूनच असे विषय करत असल्याचे राणे यावेळी म्हणाले.