रत्नागिरी: काँग्रेसचे नेते नारायण राणेंनी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणावर बोट ठेवल्यानंतर त्यांचे पुत्र निलेश राणे यांनी देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर थेट हल्ला केला आहे.


कारण राणेंनी सरचिटणीसदाचा राजीनामा दिल्यानंतर आता अशोक चव्हाणांवर टीकास्त्र सोडलं आहे. अशोक चव्हाण यांच्या कार्यपध्दतीमुळेच महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये मरगळ आली आहे. असा आरोपही त्यांनी केला आहे.

‘जिल्हा परिषद पंचायत समितीत काँग्रसेचं मोठं नुकसान झालं. तरी अशोक चव्हाणांना जाग येत नाही. त्यांच्या कार्यपद्धतीमुळेच पक्षात मरगळ आली आहे.’ असा घणाघात निलेश राणे यांनी केला.

‘मी काँग्रेस प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रभरातून मला फोन आले. मी जे  जे केलं ते योग्य केलं असं मला अनेकांनी सांगितलं. यामुळे पक्षातील मरगळ जाण्यास मदत होईल. असंही यावेळी लोकांनी सांगितलं. ही लढाई कार्यकर्त्यांसाठी आहे. मला काय जिल्हाअध्यक्ष व्हायचं नाही. मला काँग्रेसनं अनेक पदं दिली आहेत. पण माझ्या सहकाऱ्यांसाठी ही लढाई आहे.’ असं म्हणत निलेश राणे यांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला.

‘जर पक्षात कोणी चुकत असेल तर त्याला उत्तर द्यावं लागेल. माणूस कोणत्याही पदावर असला तरी तो लोकांसाठी, कार्यकर्त्यांसाठी आहे. स्वत:साठी नाही. स्वत:चा पक्ष असल्यासारखं वागू नये.’ असा टोलाही निलेश राणेंनी हाणला.

दरम्यान, आज नारायण राणेंनी देखील काँग्रेसमधील नेत्यांवर हल्लाबोल केला. “मी कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. कोणताही नेता मला भेटलेला नाही, तशी चर्चाही झालेली नाही. गेले 15 दिवस चर्चा सुरु आहे. मी कोणालाही न भेटता अशा बातम्या खात्री न करता पसरवणं चुकीचं आहे, त्यामुळे मीडियात येऊन स्वत: स्पष्टीकरण द्यावं म्हणून मी स्पष्टीकरणासाठी आलो,” असं राणे म्हणाले.

“मी काही कामानिमित्त मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यांना भेटलो म्हणजे भाजपात जातोय असं होत नाही. या बातम्या पेरण्यामागे काँगेसच्याच नेत्यांचा हात आहे. त्यांचंच षडयंत्र असल्याचं माझं मत आहे,” असा आरोपही नारायण राणे यांनी केला.

संबंधित बातम्या:

पक्षांतराच्या बातम्या पेरण्यात काँग्रेसचाच हात : राणे

नारायण राणे यांचा राजकीय प्रवास

नारायण राणे पुन्हा शिवसेनेत परतणार?