तन्मय भट्टवर कारवाई करा
"लताताई मंगेशकर आण सचिन तेंडुलकर या दोन भारतरत्न आणि संगीत -क्रिकेट क्षेत्रातील आदरणीय व्यक्तीमत्वांवर तन्मय भट आणि एआयबीच्या टीमने कुचेष्टापर व्हिडिओ तयार करून सामाजिक माध्यमात प्रसृत केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघांचे चेहरे ओंगळवाणे मुखवट्याच्या स्वरूपात दाखवले आहेत. तसेच लताताईंबाबत अश्लील, अश्लाघ्य भाषा वापरली आहे. स्री म्हणूनही त्यांच्याबाबत अपमान, अनादर आणि अवहेलना केली आहे" असं निलम गोऱ्हेंनी निवेदनात म्हटलं आहे.
"याशिवाय सचिन तेंडुलकर यांचे क्रिकेट क्षेत्रातील योगदान विश्वमान्य आहे तरीही स्वतःच्या बोगस प्रसिद्धिसाठी अथवा मानसिक विकृत भावनेतून हा व्हिडिओ तन्मय भटने प्रकाशित केला आहे. नंतर अशी माणसे माफी मागूनही मोकळी होतात, परंतु सामाजिक माध्यमांचा दुरूपयोग आणि विनाकारण उपद्रवकारी प्रवृत्तींना रोखण्यास राज्य शासनाने कारवाई करावी हे गरजेचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कडक पावलं उचलावी" अशी मागणी गोऱ्हे यांनी केली आहे.
मनसेकडून तक्रार दाखल
दुसरीकडे मनसेनेही तन्मय भटविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेने याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. केवळ माफी मागून उपयोग नाही तर अशी पातळी गाठणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
तन्मय भट्टने अकलेचे तारे तोडले
'एआयबी रोस्ट'च्या माध्यमातून चर्चेत आलेल्या विनोदी कलाकार तन्मय भटने अकलेचे तारे तोडले आहेत. ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमधून तन्मयने भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर अश्लाघ्य टिपण्णी केली.
विराट कोहली हा सचिनपेक्षा दसपटीने महान क्रिकेटर आहे, या विनोद कांबळीच्या कथित वक्तव्याचा धागा पकडून सचिन आणि लता मंगेशकर यांच्या दरम्यानच्या काल्पनिक संवादातून आक्षेपार्ह शेरेबाजी या व्हिडिओत करण्यात आली आहे.