जालना : कालपासून घरात लग्नाचे आनंदाचे वातावरण होते. वधूच्या भावी वराच्या घरी रात्री हळदीचा सोहळा आनंदात पार पडला. सर्व नातेवाईक घरची मंडळी आनंदात होते. उद्या लग्न म्हणून हळदीचा कार्यक्रम आटोपून सर्व जण घरात झोपी गेले, मात्र सकाळी हेच आनंदी वातावरण दुःखात रुपांतरित झालेले पाहायला मिळाले.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या मालखेडा गावात आज पहाटे तरुण-तरुणीचा लोखंडी पाईपला लटकलेला मृतदेह आढळून आला आणि गावात एकच खळबळ उडाली. मुंबई येथील स्नेहा आव्हाड या तरुणीचा भोकरदन तालुक्यातील कोळगाव येथील एका तरुणाशी आज विवाह ठरला होता. यासाठीची सर्व जय्यत तयारी झाली होती. मात्र सकाळी नववधूचा एका तरुणाबरोबर मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण गाव दुःखात बुडाले. मयत नववधू स्नेहाचे तिच्या मामाचा मुलगा मयत नवनाथ गायकवाड याच्यावर प्रेम होते. दोघांनी लग्न करण्याचा बेत केला होता. मात्र त्याला स्नेहाच्या घरातून विरोध होता.
याच विरोधाने घरचे लग्नास कधीच होकार देणार नाही याची खात्री झाल्याने तसेच उद्याच लग्न बंधनात अडकणार असल्याने नववधू स्नेहाने काल (शनिवारी) रात्री भावी वराच्या कोळगाव येथील घरातून हळदीच्या अंगाने पळ काढला. जवळच मालखेडा या गावात राहत असलेला प्रियकर नवनाथचे तिने घर गाठले. आपण एकत्र जगू शकत नसलो तर एकत्र मरु शकतो अशा भावनेने दोघांनी घरातील लोखंडी पाईपला दोरी बांधून गळफास लावत जीवनयात्रा संपवली. ही घटना आज पहाटे 4 वाजता उघडकीस आली. या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसांकडून मृतदेह काढून भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर आकस्मिक मृत्यूची नोंद केलीय.
नवरदेव रुग्णालयात
पुढील काळात स्नेहासोबत आनंदी जीवन जगण्याचे स्वप्न पाहणारा नवरदेव मात्र आपल्या होणाऱ्या पत्नीचा मृतदेह पाहून त्याची तब्येत खालावली. त्यामुळे नवरदेवाला भोकरदन येथील खाजगी रुग्णालयात तात्काळ हलवण्यात आले आहे. तिथे नवरदेवर उपचार सुरू असून त्याची तब्येत चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.