जळगाव : आई आपल्या नावावर जमीन करून देत नसल्याच्या कारणावरून मुलाने आपल्या सत्तर वर्षीय आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील मोर गाव खुर्द येथे घडली आहे. या घटनेत मुलाला अटक केली असून जखमी आईला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
म्हातारपणीचा आधार व्हावा म्हणून अनेकजण वंशाचा दिपक म्हणून मुलांकडे पाहत असतात. मात्र, हाच वंशाचा दिपक जेव्हा आधार देण्याच्या आईवजी जीवावर उठतो तेव्हा आता जावे तर कुठे जावे असा प्रश्न एका सतर वर्षीय मातेवर ओढवला आहे.
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील मोरगाव खुर्द येथील सुगंताबाई पाटील या सत्तर वर्षीय महिलेला दोन मुले आहेत. दोन्ही कामधंद्या निमित्ताने अहमदाबादमध्ये राहत असतात. मात्र, कोरोनामुळे कामधंदा बंद पडल्याने तिचा लहान मुलगा नवल पाटील हा मागील महिन्यापासून आईकडे राहायला आला होता. मात्र, अगोदरपासून व्यसनी झालेल्या मुलाला आपले व्यसन भागविण्यासाठी पैशांची गरज भासू लागल्याने त्याने आईला पैशांसाठी त्रास द्यायला आणि मारझोड करायला सुरुवात केली होती.
सुगंताबाईच्या नावावर असलेली दोन एकर जमीन आपल्या नावावर करून देण्यासाठी त्याने आईजवळ तगादा लावला होता. मात्र, आई त्याला दाद देत नसल्याचं पाहून रागाच्या भरात त्याने रात्री दीड वाजेच्या सुमारास आई झोपलेल्या खाटेवर पेटलेल्या पलित्याचा बोळा फेकून आईला पेटविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सुगंताबाई पाटील यांचे पाय भाजले असून त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सुगंताबाई पाटील यांचा मुलगा नवल यास अटक केली आहे. त्याच्या विरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.