नवी मुंबई : मेथ्याक्युलॉन हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका नायजेरियन नागरिकाला नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. गॅरी ओकाफोर अस या 36 वर्षीय नायजेरियन नागरिकांच नाव आहे.
पोलिसांनी खारघर सेक्टर-34 मधून गॅरी ओकाफोर याला अटक केली आहे. या आरोपीकडून पोलिसांनी सुमारे 9 लाख रुपये किंमतीच 200 ग्रॅम मेथ्याकुलॉन हा अंमली पदार्थ जप्त केला आहे.
खारघर सेक्टर-34 मधील एका सोसायटीत हा नारजेरियन नागरिक राहत होता. मात्र याच ठिकाणी हा नायजेरियन अंमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. माहिती मिळल्यानुसार पोलिसांना त्या वर्णनाचा हा नायजेरियन इसम संशयास्पदरित्या फिरताना दिसला.
पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे अंमली पदार्थ सापडला. लागलीच पोलिसांनी त्याला अटक केली. हा अंमली पदार्थ या नायजेरियन नागरिकाने कुठून मिळवला याची पोलीस चौकशी करत आहेत. मात्र, नवी मुंबईत अशा प्रकारे अवैधपणे वास्तव्य करून अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या नायजेरियन नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यांच्यावर देखील कडक कारवाई करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.