देशभरात आज ATM सुरु, मात्र अद्याप नव्या नोटा नाहीच
एबीपी माझा वेब टीम | 11 Nov 2016 07:54 AM (IST)
नवी मुंबई : देशभरात आजपासून एटीएम सुरु होणार असले तरी काल रात्रभर मुंबईत एटीएममधून आधीच्या जुन्या नोटा काढण्याचं काम सुरु होतं. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अजून नव्या 500 आणि 2 हजार रुपयांच्या नोटा एटीएममध्ये टाकलेल्या नाहीत. 'माझा'ने नवी मुंबईतील खारघर, कामोठे, पनवेल परिसरातील एटीएममध्ये जाऊन एटीएम चालू आहेत की नाही, याचा सकाळी सहा वाजताच आढावा घेतला. मात्र एकाही एटीएममध्ये पैसे नसल्याचं समोर आलं. मुंबईत आज काही ठिकाणी एटीएम उशीरा सुरु होऊ शकतात. एका बँक कर्मचाऱ्याच्या मते, अनेक ठिकाणी एटीएममध्ये पैसे भरण्यात आले आहेत. मात्र सध्या तरी सर्व एटीएमचे सर्व्हर डाऊन करण्यात आले आहेत. त्यामुळे दिवसभरात एटीएमचा व्यवहार सुरु होण्याची शक्यता आहे. जुन्या हजार, पाचशेच्या नोटा बंद केल्यानंतर नव्या नोटा घेण्यासाठी काल दिवसभर बँकेत ग्राहकांची झुंबड उडाली आहे. मात्र आज एटीएममधून व्यवहार केव्हा सुरु होतील, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.