गडचिरोली : वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात बाळ दगावल्याची घटना घडली. गडचिरोली जिल्ह्यातील ताटीगुडम या अतिदुर्गम गावातील घटनेने राज्याच्या आरोग्य विभागाला मान खाली घालावी लागली आहे. अहेरी तालुक्यातील या गावातील बाळ रुग्णवाहिकेअभावी दगावलं.
10 वर्षांनी अपत्यप्राप्ती, रुग्णावाहिकेअभावी बाळ दगावलं
नाजूक स्थितीत जन्मलेल्या या बाळाला तातडीचा उपचार मिळावा यासाठी वारंवार विनंती करूनही 108 क्रमांकाची रुग्णवाहिका पोहोचली नाही. अखेर 10 वर्षानंतर अपत्यप्राप्ती झालेल्या या दाम्पत्याचं बाळ दगावलं. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम-आदिवासी भागातील आरोग्य सेवेचं वास्तव या घटनेने पुढे आलं आहे.
गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील कमलापूर पासून जवळ असलेल्या ताटीगुडम येथे घरीच प्रसूत झालेल्या 'विनोदा पेंदाम' या महिलेच्या नवजात बाळाला वेळेवर रूग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. विनोदा कृष्णा पेंदाम हिला शुक्रवारी प्रसुतीवेदना सुरू झाल्या. गावातील आशा वर्कर सरीता हिने कमलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश मानकर यांच्याकडे संपर्क साधून रूग्णवाहिकेची मागणी केली. मात्र वेळेवर रुग्णवाहिका ताटीगुडम येथे पोहोचली नाही.
दरम्यान शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता विनोदाची घरीच प्रसुती झाली. प्रसुतीनंतर नवजात बालकाने मातेचं दूधही प्राशन केले. मात्र दुसऱ्या दिवशी शनिवारी बाळाची प्रकृती बिघडली. त्यामुळे पुन्हा रुग्णवाहिकेसाठी आशावर्करने संपर्क केला. शनिवारी देखील रूग्णवाहिका उपलब्ध नव्हती.
संध्याकाळी 108 ची रुग्णवाहिका ताटीगुडम येथे पोहोचली. बाळ घेऊन निघालेली ही रुग्णवाहिका काही अंतरावर पोहोचताच बाळाने प्राण सोडले. उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाळाला मृत घोषित केलं.
आरोग्य विभागाचा अक्षम्य हलगर्जीपणा
कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक रुग्णवाहिका बंद आहे. त्यामुळे भाडे तत्त्वावह दुसरी रुग्णवाहिका घेण्यात आली आहे. ही दुसरी रुग्णवाहिका एका डॉक्टरने खाजगी कामासाठी नेल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध करुन देता आली नाही.
अक्षम्य निष्काळजीपणा आणि आणीबाणीच्या क्षणी ढिसाळ प्रतिसादाने गडचिरोलीतील आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं. या संदर्भात एबीपी माझाने कमलापूर प्राथमिक आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
रुग्णवाहिकेच्या अभावामुळे दुर्गम भागातील रुग्णांना स्वतःला काठीच्या सहाय्याने दोन्ही बाजूला बांधून खांद्यावर आणावं लागतं हे जिल्ह्यातील दुर्गम भागातील वास्तव आहे. ढिसाळ 108 व्यवस्थापन आणि निष्काळजी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
10 वर्षांनी अपत्यप्राप्ती, रुग्णवाहिकेअभावी बाळ दगावलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 May 2018 10:48 AM (IST)
गडचिरोली जिल्ह्यातील ताटीगुडम या अतिदुर्गम गावातील घटनेने राज्याच्या आरोग्य विभागाला मान खाली घालावी लागली आहे. अहेरी तालुक्यातील या गावातील बाळ रुग्णवाहिकेअभावी दगावलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -