बीड : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरकारने कर्जमाफी जाहीर केली. अनेकांनी अजूनही या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. मात्र बीडच्या एका शेतकऱ्याला 14 महिन्यानंतरही न मिळालेला कर्जमाफीचा लाभ उद्धव ठाकरेंमुळे अवघ्या 5 तासात मिळाला आहे. कर्जमाफीची घोषणा किती फसवी आहे हेच उद्धव ठाकरे यांनी बीडच्या जाहीर सभेत दाखवून दिले. बाळासाहेब सोळंके असे या शेतकऱ्याचे नाव आहे.


उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभेत बोलत असताना कर्जमाफीचा लाभ कुणाकुणाला मिळाला आहे असे विचारले. यावेळी त्यांनी बाळासाहेब सोळंके या शेतकऱ्याला व्यासपीठावर बोलावले. त्याच्या हातातील कर्जमाफीचा प्रमाणपत्र दाखवून त्याला कर्जमाफी मिळाली का? असा सवाल विचारला. शेतकऱ्याने सांगितले की मला फक्त कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळाले अद्याप माझे कर्ज माफ झालेले नाही.

काही शेतकऱ्यांना 14 महिन्यापूर्वी कर्जमाफी झाल्याचा सत्कार करून जिल्हाधिकाऱ्यांनी व प्रमाणपत्र दिले होते मात्र फक्त प्रमाणपत्र मिळाले कर्ज मात्र माफ झाले नव्हते. आज या शेतकऱ्याचा उल्लेख स्वतः उद्धव ठाकरे आणि भर सभेत केल्यानंतर मात्र प्रशासन खडबडून जागे झाले आणि अखेर उद्धव ठाकरेंच्या सभेच्या आठ तासानंतर या शेतकऱ्याला 98 हजार रुपयांची कर्जमाफी झाली आहे.

ठाकरे यांनी कर्जमाफीच्या फसवेगिरीचा पर्दाफाश केल्यानंतर अवघ्या पाच तासात सरकारने सूत्रे हलवली आणि सायंकाळी या शेतकऱ्याचे कर्ज परस्पर भरून कर्जाचे खाते बंद करण्यात आले. यावरून राज्यातल्या शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा सरकारने चालवल्याचे दिसून आले. उद्धव ठाकरे यांच्यामुळे मला न्याय मिळाला, मी त्यांचे शतशः आभार मानतो, अशा शब्दांत सोळंके या शेतकऱ्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

बाळासाहेब हरिभाऊ सोळंके यांच्या बँक खात्यात संध्याकाळी 5.30 वाजता कर्जमाफीचे पैसे थेट जमा करण्यात आल्याचे बँक व्यवस्थापकांनी सांगितले. दुपारी मंत्रालयातून आदेश आले आणि सायंकाळी त्या शेतकऱ्याचे कर्जाचे खाते बंद करण्यात आले. त्यामुळे कर्जमाफीबाबत आणखी प्रश्न निर्माण झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत या शेतकऱ्याच्या बँक खात्यात 98,995 रुपये तत्काळ जमा करुन कर्ज खाते बंद करण्यात आल्याची कबूली बँक व्यवस्थापकांनी दिली आहे.