ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर 'गोडसे' चित्रपटाचा 'टिझर' नुकताच लाँच केला आहे. मांजरेकरांनी 2 ऑक्टोबरला गांधी जयंती दिनीच नथूराम गोडसेच्या जीवनावरील चित्रपट 'गोडसे'ची घोषणा केली होती. या चित्रपटाच्या निमित्ताने यावर सकारात्मक-नकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. यात सरकारमधील राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महेश मांजरेकरांच्या या प्रस्तावित चित्रपटाला विरोध करीत टीका केली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट विभागानं या चित्रपटाविरोधात थेट आरपारच्या लढाईचाच इशारा दिला आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण आणि पुढे चित्रपट तयार झाला तरी प्रदर्शन बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी महेश मांजरेकरांना हा इशारा दिला आहे. यासोबतच महेश मांजरेकर 'होस्ट' करीत असलेल्या 'बिग बॉस'चं लोणावळ्यातील सेटवरचं चित्रीकरण बंद पाडण्याचा धमकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट विभागानं मांजरेकरांना दिली आहे. 


काय आहे राष्ट्रवादी चित्रपट विभागाची भूमिका :


   यासंदर्भात राष्ट्रवादी चित्रपट विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी 'एबीपी माझा' कडे आपल्या पक्षाच्या चित्रपट विभागाची सविस्तर भूमिका मांडली. ते म्हणाले की, "चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता असलेले महेश मांजरेकर यांनी गांधी जयंतीनिमित्त नवीन  'गोडसे' नावाच्या चित्रपटाची घोषणा केली. सोबतच या चित्रपटाचे 'टीझर' त्यांनी गांधी जयंतीच्या मुहूर्ताावरच रिलीज केले. घोषणा केलेला हा चित्रपट महेश मांजरेकरांच्या हीन वैचारिक पातळीची साक्ष देणारं आहे, असा टोला बाबासाहेब पाटील यांनी मांजरेकरांना लगावलाय. 


     स्वातंत्र्य मिळवण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधींचं काम   अद्वितीय होतं. त्याच महात्म्याच्या जयंतीदिनी त्यांचाच मारेकरी असलेल्या नथुराम गोडसेच्या आयुष्यावर सिनेमाा निर्माण  करण्याचा मूर्खपणाचाा घाट महेश मांजरेकर यांनी घातल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
महेश मांजरेकर यांनी 'मी शिवाजीराजे भोसले बोलतो' हा चित्रपट तयार करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधुनिक विचारांचा वारसा मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता आणि त्यात ते यशस्वीही झालेत. यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेसह राष्ट्रवादी काँग्रेसनंही त्यांचा नेहमी सन्मान सुद्धा केल्याचं पाटील म्हणालेत. नथुराम गोडसे यांच्यावरील चित्रपट निर्मितीमागे  विकृत मानसिकता असलेल्या कोणत्या यंत्रणेचा तर हात नाही ना?, असा सवाल राष्ट्रवादी चित्रपट आघाडीने यानिमित्ताने केला आहे. महात्मा गांधीच्या लोकप्रियतेला ठेस पोहोचवून त्यांच्याप्रती द्वेष निर्माण करून नथुराम गोडसेला 'हिरो' करण्याचा प्रयत्न तर मांजरोकरांचा नाही ना?, असा सवाल त्यांनी मांजरेकरांना केला आहे. महाराष्ट्राच्या मातीत अशा विकृत मानसिकता असलेल्या व्यक्तीचे उदात्तीकरण करण्याचं काम कुणी ही केलं तर राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष असे उपद्व्याप कदापिही खपवून घेणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने दिला आहे.


'गोडसे' चित्रपटाचं चित्रीकरण आणि प्रदर्शन महाराष्ट्रात होऊ देणार नाही : बाबासाहेब पाटील


     भविष्यात या चित्रपटाचं चित्रीकरण महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात होऊ देणार नसल्याचा इशारा बाबासाहेब पाटील यांनी महेश मांजरेकरांना दिला आहे. चित्रीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उधळून लावणार असल्याचा गर्भित इशाराच त्यांनी यानिमित्ताने दिला आहे. यासोबतच यदाकदाचित हा चित्रपट याऊपरही तयार होऊन प्रदर्शित होणार असेल तर त्याला महाराष्ट्रातील कोणत्याच चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याची धमकी राष्ट्रवादी चित्रपट विभागाच्यावतीने बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. 


...तर 'बिग बॉस'चे चित्रीकरण बंद पाडू : बाबासाहेब पाटील 


    हा चित्रपट निर्मितीचा प्रकल्प  महेश मांजरेकरांनी मागे घेण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट विभागानं मांजरेकरांना केली आहे. याही परिस्थितीत मांजरेकरांनी माघार न घेतल्यास निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादीनं दिला आहे. मांजरेकर 'होस्ट' करीत असलेल्या 'बिग बॉस'चं लोणावळ्यातील सेटवरचं चित्रीकरण बंद पाडण्याची धमकीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट विभागानं मांजरेकरांना दिली आहे.