पुणे: फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणं हे दुर्दैवी आहे, यावर त्यापेक्षा आणखी मोठा प्रकल्प आणण्याचं आमिष म्हणजे रडणाऱ्या मुलाची समजूत काढण्यासारखं आहे अशी टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली. यावर आता चर्चा करण्यात काही अर्थ नसल्याचं सांगत पंतप्रधानांनी असा मोठा प्रकल्प दिला तर त्याचं स्वागतच आहे असंही ते म्हणाले. फॉक्सकॉन वादावर शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर टीका केली आहे. 


तळेगावच हेच या प्रकल्पासाठी योग्य


राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणाले की, "तळेगाव हा जो स्पॉट आहे , त्याच्या आजूबाजूचा चाकण आणि रांजनगाव हा ऑटोमोबाईलसाठी अनुकूल आहे. इथं जर हा प्रकल्प असता तर कंपनीला अधिक फायदेशीर असता. त्यामुळे तळेगाव हीच या प्रकल्पासाठी योग्य जागा होती.  महाराष्ट्रातून हा प्रकल्प जाणे म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे, तसं व्हायला नको होतं."


एकनाथ शिंदे आणि उदय सामंत हे त्यावेळी मंत्री


शरद पवार म्हणाले की, "महाविकास आघाडीने यावर काही निर्णय घेतला नाही असा आरोप करण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे आणि उदय सामंत हे होते. तरीही ते असं बोलतात. फॉक्सकॉनच्या बदल्यात दुसऱ्या प्रकल्पाला अर्थ नाही. 


केंद्राची सत्ता हाती असण्याचे अनुकूल परिणाम काही राज्यांवर होत असतात. त्यामध्ये गुजरात आहे असं शरद पवार म्हणाले. 


राज्यकर्त्यांचे लक्ष नाही 


या आधी महाराष्ट्राच्या नेतृत्वामुळे राज्यात गुंतवणूक यायची आता ती परिस्थिती दिसत नाही असं सांगत सध्याची परिस्थिती पाहता राज्यकर्त्यांचे राज्याकडे लक्ष आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय असं शरद पवार म्हणाले. 


महाराष्ट्राचे नेतृत्व गतीनं फिरतंय 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यातील दौऱ्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, गतीनं फिरुन  राज्य समजावून घेण्याचा प्रयत्न असेल
राज्याचे प्रमुख गतीनं राज्यभर फिरून ते समजावून घेण्याचा प्रयत्न करत असतील.


महाराष्ट्र नेहमी एक नंबरला


या आधीची परिस्थिती अशी होती की महाराष्ट्र नेहमी गुंतवणूकीच्या बाबतील एक नंबरला असायचं असं सांगत शरद पवार म्हणाले की, "काही नेते आणि अधिकारी हे नेहमी गुंतवणूक कशी येईल याकडे लक्ष द्यायचे. आताची परिस्थीती पाहता ते दिसत नाही, राज्यकर्त्यांचे लक्ष नाही. आता फक्त काय झाडी, काय डोंगर हे ऐकायला मिळतंय. शिंदे सरकारचा कारभार अजून मला दिसला नाही."