Jayant Patil on Cabinet Expansion:  राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्तारावरून (Cabinet Expansion) अनेक चर्चा सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्ष हे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन देखील पार पडलं मात्र, अद्याप मंत्रीमंडळ विस्तारावर कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीयेत. अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल, अशी चर्चा रंगली होती. मंत्रिमंडळ विस्तार केला नाही यावरून विरोधक सातत्याने सत्ताधाऱ्यांना लक्ष करत असल्याचं चित्र दिसून येत आहे. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत काल(बुधवारी) बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मंत्रीमंडळ विस्ताराबाबत बोलताना आमच्या मंत्रीपदाचे स्वप्न किमान दोन महिने तरी पूर्ण होऊ दे असे बरेच आमदार मागे लागले असल्याचं म्हणत महायुतीवर हल्लाबोल केला आहे. 


राज्याच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत (Cabinet Expansion) बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, 'परत मंत्रिमंडळाचा विस्तार आता होणार नाही, ही शेवटची संधी आहे असं काही आमदारांना वाटतं आहे. त्यामुळे आमच्या मंत्रीपदाचे स्वप्न किमान दोन महिने तरी पूर्ण होऊ दे असे बरेच आमदार मागे', लागल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 


मंत्रीमंडळ विस्तारावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया



लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) होणार आहे, काळजी करु नका. मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, असं काहीच नाही, लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल निर्णय होईल, तुम्हाला लवकरच याबद्दलची बातमी देईन लवकरच याबाबत बातमी देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. सरकार कोणावरही अन्याय करणार नाही, भेदभाव करणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले. गडकोट किल्ल्यांबाबत एक ॲक्शन प्लॅन तयार करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. 


संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे, अन्यथा...,शिरसाट यांचं वक्तव्य



 राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल (Cabinet Expansion) एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही भाष्य केलं आहे. संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे, अन्यथा अनेक आमदार नाराज होतील. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी काय हरकत नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे संजय शिरसाटांनी म्हटलं आहे.


विशाळगडाच्या पायथ्याला घडलेली घटना अतिशय गंभीर - जयंत पाटील


विशाळगडाच्या पायथ्याला घडलेली घटना अतिशय गंभीर आहे. पायथ्याला असलेल्या लोकांना वरती जाऊ न दिल्याने त्यांनी तेथील धार्मिक स्थळावर हल्ला केला. तेथील लोकांची घरदारं फोडून, तिजोऱ्या लुटून त्यातील संपत्ती नेली. हे शिवप्रेमींचे लक्षण नसून पुण्यातील किंवा कुठूनतरी वेगळ्या ठिकाणावरून आलेले गुंड आहेत. अशा पद्धतीने कोणाच्याही घरात घुसून घर फोडायला लागली तर राज्यात अराजकता निर्माण होईल. त्यामुळे सरकारचे हे मोठं फेल्युअर आहे, असंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे.