काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे दोघेही सध्या संभ्रमात आहेत. त्यासाठी कारणही तसंच आहे. ऑक्टोबर महिन्यात अपेक्षित विधानसभा निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी निश्चित आहे. त्यामुळे इंदापूरची जागा नक्की कुणाला मिळणार या काळजीने पाटील आणि भरणे चिंताग्रस्त तसंच संभ्रमातही आहेत..

सध्या राज्यातील विधानसभा निवडणुकीला जोर चढत आहे. युती, आघाडीच्या चर्चांना वेग आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागावाटपात पुणे जिल्ह्यातील इंदापूर हा मतदारसंघ कळीचा मुद्दा ठरणार आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे गेल्या वीस वर्षांपासून करत आहेत. या सर्व वीस वर्षात ते मंत्री होते. पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना त्यांना चारी मुंड्या चित करीत त्यांचे निकटवर्तीय दत्तात्रय भरणे यांना इंदापूरचं आमदार बनवलं. आघाडीत ज्याचा आमदार त्या पक्षाकडे तो मतदारसंघ हे सूत्र जवळपास निश्चित आहे. यानुसार इंदापूरवर राष्ट्रवादीचा सध्या हक्क असल्याचं राष्ट्रवादीच म्हणणं आहे. अंथुर्णे येथील सभेत अजित पवार यांनी या बद्दल जाहीर वक्तव्यही केलं होतं, "आघाडी नाही झाली तरी बेहत्तर, पण इंदापूरची जागा राष्ट्रवादीचं लढवणार" असं भर सभेत अजित पवार बोलल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांमध्ये उत्साहाचं  वातावरण आहे.


इंदापूर मतदार संघातून हर्षवर्धन पाटील सलग चार वेळा निवडून आले आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी काँग्रेसला हा मतदारसंघ हवा आहे. त्यामुळे इंदापूरच्या जागेचा मुद्दा कसा सुटणार याकडे इंदापूरच्या मतदारांचं लक्ष लागलंय.

हर्षवर्धन पाटलांना पवारांचा शब्द...?

लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांनी आघाडीचा धर्म पाळावा आणि सुप्रिया सुळे यांचा प्रचार करावा म्हणून खुद्द शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांची भेट झाली होती.  तर अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे हर्षवर्धन पाटलांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. यात पवार घराणे पाटील यांची मनधरणी करण्यात यशस्वी झाले. हर्षवर्धन पाटील यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला. इंदापूर तालुक्यातून सुप्रिया सुळे यांना ७० हजाराचं मताधिक्य मिळालं. सुप्रिया सुळे यांना मिळालेल्या मताधिक्यात काँग्रेसचा वाटा मोठा असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. लोकसभेच्या प्रचारादरम्यान शरद पवार यांनी विधानसभेला इंदापूरची जागा काँग्रेसला अर्थात हर्षवर्धन पाटील यांना सोडणार असा शब्द दिल्याची चर्चा काँग्रेस मध्ये आहे. मात्र राजकारणात दिलेला शब्द किती पाळला जातो याचा भरवसा नसतो.. तसंच असा काही शब्द दिल्याचं अजित पवार, सुप्रिया सुळे किंवा शरद पवार यांनीही जाहीरपणे कुठे सांगितलेलं नाही.

त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना पवारसाहेब जागा सोडतात की ऐन वेळी राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करतात, असा प्रश्न पडलाय.

तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटलांना खुद्द पवारसाहेबांनी ही जागा सोडणार असल्याचा शब्द दिल्यामुळे आपल्याला राष्ट्रवादीची जागा मिळते की नाही याची विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनाही खात्री नाही.

जर आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तर भाजप किंवा अन्य पक्षातून उमेदवारी मिळवायची का?  या विचारात सध्या भरणे व पाटील हे दोघेही आहेत अशी तालुक्यात चर्चा आहे.


राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्या..

इंदापूर विधानसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी अग्रेसर आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीत इंदापूरमधील दिग्गज नेत्यांनी मुलाखती दिल्या. यात इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रवीण माने, यांच्यासह आणखी तीन ते चार नेते आहेत.  विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इंदापूर तालुक्यातून इच्छुकांची गर्दी वाढल्याने राष्ट्रवादीपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. योग्य उमेदवार निवडण्यासाठी पक्षश्रेष्ठींना मोठी कसरत करावी लागणार आहे. इच्छुक उमेवारांमुळे अंतर्गत बंडाळी होण्याची दाट शक्यता आहे. याचा मोठा फायदा हर्षवर्धन पाटील यांना नक्कीच होणार अशी चर्चा प्रत्येक गाव-वस्त्यांवरील पारावर रंगत आहेत.

आमदार भरणेच्या संदर्भात अनपेक्षित निर्णय घेण्यात आला तर पुणे जिल्यातील धनगर समाज राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवू शकतो
आमदार भरणे यांना उमेदवारी दिली गेली नाही तर राष्ट्रवादीला धनगर समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याचं बोललं जातं. बारामती लोकसभा मतदार संघात धनगर सामाजाचं मतदान मोठ्या प्रमाणावर आहे. इंदापूर, बारामतीसह इतर तालुक्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे, धनगर समाजाचं आमदार भरणेवर असलेले प्रेम, भरणेबद्दल असलेली आपुलकी पाहता जर भरणे यांना उमेदवारी दिली गेली नाही तर, त्याचा फटका विधानसभेला राष्ट्रवादीला  संपूर्ण पुणे जिल्ह्यात बसू शकतो. त्यामुळे भरणे यांचा विचार राष्ट्रवादीला करावंच लागणार आहे.

आमदार भरणे यांचा वाढता संपर्क


गेल्या पाच वर्षात आमदार भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या गावात किमान १०० कुटुंब पक्के मतदार बनवले आहेत. गावागावातील या लोकांसाठी आमदार भरणे हेच पक्ष आहेत. भरणे यांचा पक्ष कोणता, याच्याशी त्या कुटुंबाना काही देणं-घेणं नाही. आमदार भरणे यांनी या पाच वर्षात स्वतःची अशी एकगठ्ठा वोटबँक गावागावात तयार करुन ठेवलीय. त्यामुळे  भरणे यांची ही आणीबाणीच्या वेळी त्यांना विजयाकडे नेणारी कुमक असल्याचे राजकीय अभ्यासकांना वाटतं.

हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांचं राजकीय वैर तर दुसरीकडे शरद पवारांचे पाटलांचे वाढते संबंध..

हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांचे राजकीय वैर आख्या महाराष्टराला माहित आहे. हे दोन्ही नेते कायमच एकमेकांवर कुरघोडी करत असतात. याची अनेक उदाहरणे महाराष्ट्राला परिचित आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची हर्षवर्धन पाटील यांच्याशी जवळीक आहे. हर्षवर्धन पाटील यांची मुलगी नूतन जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांना इंडियन शुगर मिल्स असोसिएशन, नवी दिल्लीच्या सदस्य म्हणून म्हणून काही महिन्यापूर्वी घेण्यात आलं आहे. तसंच हर्षवर्धन पाटील यांना नवी दिल्ली येथील राष्ट्रीय साखर कारखाना संघाच्या संचालकपदी फेरनिवड करण्यात आलेली आहे. ही पदे शरद पवार यांचा वरदहस्त असल्याशिवाय मिळत नाहीत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना अजित पवार यांचा विरोध असला तरी शरद पवार पाठीशी असल्याचं दिसून येत आहे.

इतर पक्षांचे निर्णय झाल्यावरच युतीचा उमेदवार ठरणार..

सध्या इंदापूर तालुक्यात भाजप किंवा शिवसेनेकडे तुल्यबळ उमेदवार नाही. या दोन्ही सत्ताधारी पक्षांना बाहेरुन उमेदवार आणावा लागणार आहे. जर आघाडीची गणिते बिघडली तर भरणे - पाटील किंवा अन्य उमेदवार या पक्षांना मिळेल. तुल्यबळ उमेदवार, त्याची स्वतःची वोटबँक आणि तालुक्यातील भाजप-शिवसेनेची मते एकत्रित होऊन जर २०१९ च्या प्रस्तावीत लढतीत यश मिळालं तर इंदापूर तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना भाजप युतीचा आमदार मिळेल. पण त्यासाठी भाजप शिवसेना युती होणं ही गरजेचं आहे.

बहुजन वंचित आघाडी ही तयारीत…


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीला इंदापूर तालुक्यात अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळली आहेत. त्यामुळे बहुजन वंचित आघाडीही तुल्यबल उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. सध्या त्यांचे इंदापूर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी छोटे मोठे मेळावे होत आहेत. त्यामुळे वंचित आघाडीच्या उमेदवाराचा फटका सध्याच्या सत्ताधारी यांना बसू शकतो.

एकंदरीतच जोपर्यंत आघाडीचा उमेदवार जाहीर होत नाही, तोपर्यंत इंदापूरमध्ये राजकीय घडामोडीना वेग येणार नाही. त्यामुळे सध्या इंदापूर तालुक्यातील नेत्यांसह नागरिकही संभ्रमात आहेत.

इंदापूर विधानसभा मतदार संघाचा २०१४ चा निकाल

दत्तात्रय भरणे, (राष्ट्र्रवादी)  :- १,०८,४०० (विजयी)
हर्षवर्धन पाटील  (काँग्रेस) :- ९४,२२७
ज्ञानदेव चवरे  (भाजप)  :- ४,२६०
विशाल बोन्द्रे (शिवसेना) :- २,१८४