नागपूर: शरद पवार (Sharad Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आहे, त्यामुळे कायदेशीररित्या पक्षाचं नाव आणि चिन्ह त्यांच्याकडेच राहील असे आम्हाला वाटते. मात्र निवडणूक आयोग (Election Commission News Update) आमच्या बाजूने निर्णय देईल का? या बद्दल आम्ही साशंक आहोत. निवडणूक आयोग भाजपच्या हातातील बाहुले आहे असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलं आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाचा वाद आता निवडणूक आयोगाच्या दारी पोहोचला असून त्यावर आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, निवडणूक आयोग हे भाजपच्या हातातील बाहुले आहे. त्यामुळे पक्ष आणि चिन्हाचा निकाल आमच्या बाजूने लागेल की नाही याबद्दल आम्ही साशंक आहोत. 


विशेष म्हणजे अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या प्रफुल पटेलांनी काही दिवसांपूर्वी पक्षाचे चिन्ह आणि नाव त्यांना मिळेल असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानंतर आता रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर चर्चा होत आहे. 


आमदार रोहित पवार म्हणाले की, निवडणूक आयोग आमच्या विरोधात निर्णय देण्याची शक्यता आहे. पण भविष्यात मात्र न्यायालयीन लढाई आम्ही निश्चित जिंकू. 


दरम्यान, पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किमान 80 जागा मिळतील असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, सन 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 15 जागादेखील निवडून येणार नाहीत असं बोललं जात होतं. मात्र 80 वर्षांचा वृद्ध नेता बाहेर पडला आणि आमचे 55 आमदार जिंकून आले. तेव्हा काही छोटे छोटे नेते आम्हाला सोडून गेले होते. मात्र तेही लोकांना रुचले नव्हते.आता तर मोठे नेते आम्हाला सोडून गेले आहे, ते लोकांना मुळीच रुचणार नाही. त्यामुळे आम्ही 55 वरून 80 वर जातो की आणखी पुढे जातो हे भविष्यात कळेल.


अजित पवारांना सत्तेची लालसा आहे का या प्रश्नावर मात्र रोहित पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अजित पवार मोठे नेते आहे, त्यांच्याबद्दल काहीही बोलायचे नाही. कदाचित पक्षातील काही लोकांमध्ये अस्वस्थता होती. पुढची निवडणूक आपण कशी लढायची याबद्दल त्यांची अस्वस्थता असेल. कदाचित त्यापैकी काहीना 60 वर्षांचा विचार सोडून आजवर राष्ट्रवादी ज्या भाजपच्या विरोधात लढली, त्यांच्याच सोबत जायचे असेल. मात्र शरद पवार यांनी ठणकावून सांगितले की मी भाजपसोबत जाणार नाही. म्हणून ते लोकं पक्ष सोडून गेले असावेत. 


ही बातमी वाचा: