पुणे : राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यानंतर पवार कुटुंबीयातून आणखी एक व्यक्ती भावी मुख्यमंत्र्यांच्या रांगेत आलेले आहेत. ते दुसरे तिसरे कोणी नसून पहिल्यांदाच आमदार झालेले रोहित पवार ( Rohit Pawar ) आहेत. रोहित पवार यांच्या वाढदिनानिमित्त शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. याची जोरदार चर्चा आता राजकीय क्षेत्रात सुरू आहे. 


पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर लागलेले हे फ्लेक्स सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. त्यांच्या समर्थकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे हे फ्लेक्स झळकवले आहेत. रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायची आहे, असा गौप्यस्फोट अजित दादांचे समर्थक, पदाधिकारी आणि आमदारांनी केला होता. आज भावी मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छांच्या निमित्ताने यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे.


या आधी राष्ट्रवादीतून पहिला अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री असे बोर्ड लावले होते. त्यावर सख्याबळ नसल्याने मुख्यमंत्री होऊ शकत नाही असं सांगत अजित पवारांनी असे बोर्ड लावू नयेत अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीच्या मुंबईतील कार्यालयाजवळ सुप्रिया सुळे यांचाही अशाच पद्धतीने बोर्ड लावण्यात आला होता. त्याच्यानंतर आमदार जयंत पाटील यांचेही भावी मुख्यमंत्री असे बोर्ड झळकले होते. 


या जेष्ठ नेत्यांच्या नंतर आता पहिल्यांदाच आमदार झालेल्या रोहित पवारांचा उल्लेखही त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून केला आहे. याची चर्चा मात्र जोरदार सुरू आहे. 


Rohit Pawar On Ajit Pawar : मला टार्गेट केलं जातंय : रोहित पवार


भाजपचा विचार स्वीकारून त्यांच्यासोबत गेलेल्या राष्ट्रवादीतील दुसऱ्या गटाने मला टार्गेट करण्याची रणनीती ठरवली आहे अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे. ते म्हणाले की, माझ्यावर केले जाणारे आरोप हे हास्यास्पद आहेत. अजितदादांपूर्वी मी राष्ट्रवादीत जाणार असल्याचा नवा आरोप केला जात आहे आणि ते हास्यास्पद आहे. 


भाजप बरोबर अजित पवार यांच्या आधी रोहित पवार जाण्यास उत्सुक होते या आरोपावर बोलताना रोहित पवारांनी उपरोधिक टीका केली. ते म्हणाले की, आपली मोदी, शाह आणि डोनाल्ड ट्रंप यांच्या बरोबर बैठक झाली होती. पण भाजप हेकेखोर असल्याचे लक्षात आल्याने आपण गेलो नाही. 


अजितदादांवर भाजपचा छोटा नेता बोलतो, त्यावेळी गप्प बसणारे दुसऱ्या गटातील नेते माझ्यावर टीका करताना मात्र जागे होतात असे रोहित पवार म्हणाले. यातून त्यांना भाजपला खूश करायचं असेल असाही टोला त्यांनी लगावला. 


ही बातमी वाचा: