NCP Politics : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना (Ajit Pawar) निवडणूक आयोगाने दिल्यावर शरद पवारांसाठी (Sharad Pawar) हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) या निर्णयानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटात आता अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवारांच्या बाजूने निकाल लागल्यामुळे 'राष्ट्रवादी'त काय घडू शकतं? याबाबत काही शक्यता वर्तवल्या जात आहे. विशेष म्हणजे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून पक्षाच्या कार्यालयासह अनेक गोष्टींवर दावे प्रतिदावे केले जाण्याची शक्यता आहे. 


'राष्ट्रवादी'त काय घडू शकतं?



  • अजित पवार गट राज्यभरातील पक्षाच्या नावाने असणारी कार्यालये ताब्यात घेण्याची शक्यता. सध्या काही कार्यालयं राष्ट्रवादी वेल्फेअर असोसिएशनच्या नावाने देखील आहेत. तिथं अडचण निर्माण होईल कारण त्याचे अध्यक्ष शरद पवार आहेत.

  • मुंबईतील बेलार्ड पियर येथील पक्ष कार्यालय अजित पवार गट ताब्यात घेण्याची शक्यता.

  • पक्षाच्या नावाने आलेल्या देणग्या, ठेवी देखील अजित पवार गट ताब्यात घेण्याची शक्यता.

  • सोशल मीडियात शरद पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह नाव वापरता येणार नाही. 


पक्ष कार्यलयावरून संघर्ष पाहायला मिळणार? 


शिवसेनेत झालेल्या गटबाजीनंतर निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह दिले होते. त्यामुळे पुढे दोन्ही गटात अनेक मुद्यावरून वाद पाहायला मिळाले. विशेष म्हणजे राज्यभरातील पक्षाचे कार्यालय आपल्या ताब्यात घेण्यासाठी दोन्ही गटात संघर्ष देखील पाहायला मिळाला. आता राष्ट्रवादीत देखील अशीच काही परिस्थिती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील अनेक महत्वाच्या शहरात राष्ट्रवादी पक्षाचे कार्यालय असून, ते आपल्या ताब्यात घेण्यासाठी अजित पवार गटासह शरद पवार गटाकडून प्रयत्न केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह नाव वापरता येणार नाही...


निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांना दिले आहे. त्यामुळे अधिकृतरीत्या राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांच्या ताब्यात गेला आहे. आता अशा परिस्थितीत शरद पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही. विशेष म्हणजे, आता शरद पवारांना पक्षासाठी नवं नाव आणि चिन्ह शोधावं लागणार आहे. तर, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने लागल्यानंतर शरद पवार गटाने चार चिन्हांची निश्चिती केल्याची माहिती समोर येत आहे. त्यापैकी एका चिन्हाची निवड करून बुधवारी निवडणूक आयोगाला त्याची माहिती देण्यात येणार असल्याची माहिती आहे. शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत शरद पवार गटाला आपल्या नव्या पक्षाचं नाव आणि चिन्हाची सूचना देण्याची मुदत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


NCP Crisis :निवडणूक आयोगाकडून भूमिका स्पष्ट, आता नार्वेकरांच्या निकालाकडे लक्ष, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचा निर्णय 14 फेब्रुवारीला लागण्याची शक्यता