नवी दिल्ली : राज्यांचे अधिकार 2018 मध्ये काढून घेतले नसते तर मराठा आरक्षण कदाचित टिकलंही असतं. 'एबीपी माझा' च्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हा गंभीर आरोप केला आहे. 102 वी घटनादुरुस्ती 2018 मध्ये आली आणि त्या अंतर्गत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना झाली. त्यानंतर तत्कालिन फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचा कायदा आणला. सुप्रीम कोर्टाने नंतर निकालात आरक्षण नाकारताना राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या स्थापनेनंतर राज्यांना हा अधिकारच नसल्याचे म्हटले आहे. हाच संदर्भ घेत सुप्रिया सुळे यांनी हा गंभीर आरोप केला आहे.


 मुख्यमंत्र्यांना तेव्हाच्या तांत्रिक गोष्टी लक्षात आल्या नव्हत्या का, तेव्हाच ही दुरुस्ती का नाही केली? असा सवाल करत सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. लोकसभेतल्या चर्चेत भाजपने नारायण राणे यांना का बोलू दिले नाही. राणे साहेब हे समितीचे अध्यक्ष होते, खरंतर सभागृहातल्या चर्चेची सुरुवातच त्यांनी करायला पाहिजे होती. पण भाजपची नियत साफ नसल्याने त्यांनी बोलू दिलं नाही. असाही टोला त्यांनी लगावला आहे.संदिग्धतेतून मतभेद आणि मतभेदातून कटुता तयार करणे समाजात हा भाजपचा प्लॅन असल्याचा आरोपही त्यांनी केला. 


मराठा लिंगायत आदिवासी मुस्लीम सर्वच आरक्षणाच्या बाबतीत भाजप हे कायम करतं असं त्या म्हणाल्या आहेत. 127 व्या घटना दुरुस्ती बाबत सभागृहात जी चर्चा झाली त्यात सरकार म्हणून एक भूमिका पक्ष म्हणून एक भूमिका अशी तफावत भाजपमध्ये दिसते.जाणून बुजून ती ठेवली गेल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. कालची घटना दुरुस्ती केली ती राज्य सरकारच्या मागणीनुसारच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजित पवार, अशोक चव्हाण हे पंतप्रधानांना भेटले होते त्यानंतर ही दुरुस्ती आली पण त्यातली फक्त अर्धी गोष्ट केंद्राने केलीय, उरलेल्या अर्ध्या गोष्टीवर सुद्धा त्यांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे. 50% मर्यादेची अडचण होते हे काल चर्चेत त्यांच्या मंत्र्यांनीही कबूल केलं. पण तरीदेखील सरकार हालचाल करत नसेल तर याचा अर्थ त्यांना फक्त जबाबदारी नको आहे, असे सुप्रिया सुळे  म्हणाल्या.


केंद्रीय मंत्र्यांच्या जन आशीर्वाद रॅलीवरून देखील सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला. कुठलीतरी जन आशीर्वाद रॅली काढत आहेत आता त्यात त्यांनी खरं बोललं तर बरं होईल, नाहीतर खोटं बोलून समाजाच्या मनातले गैरसमज आणखी वाढतील हे काम भाजपनं आधीही केला आहे, असं देखील  सुप्रिया सुळे म्हणाल्या