अकोला : सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रकोपानं महाराष्ट्र अक्षरशः सैरभैर झाला आहे. राज्यातील रूग्णांचं प्रमाण दररोज हजारोंच्या संख्येत वाढत आहे. या संकटात राज्यातील आरोग्य व्यवस्था अक्षरशः कोलमडून गेल्याचं चित्रं अगदी दररोज पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी 'बेड' न मिळाल्यानं, व्हेंटिलेटर नसल्यानं अन ऑक्सिजन न मिळाल्यानं शेकडो रूग्णांना जीवाला मुकावं लागलं आहे.


राज्यात अनेक ठिकाणी सरकारनं खाजगी दवाखान्यांना 'कोविड रूग्णालय' म्हणून मान्यता दिली आहे. मात्र, आता सरकारी दवाखान्यांबरोबरच खाजगी दवाखान्यातही कोरोना रूग्णांचे 'बेड' अगदी 'फुल' झाले आहेत. अनेक रुग्णालयांमध्ये 'वेटिग लिस्ट' ही शेकडोंच्या घरात आहे. खाजगी दवाखान्यांमध्ये अनेक बेड पैशावाल्यांनी अडवून ठेवल्याचं विधान अलिकडेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं होतं. राज्यातील सध्याच्या 'बेड' अनागोंदीचा अनुभव आणि फटका राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांना बसलाय.


आमदार अमोल मिटकरी यांनी यासंदर्भात एक संतप्त आणि भावनिक 'पोस्ट' आपल्या फेसबुक 'पेज'वर 'शेयर' केली आहे. ही घटना 13 सप्टेंबरची आहे. त्यांच्या अकोल्यातील एका मित्राच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. मित्राच्या वडिलांची आर्थिक स्थिती चांगली असल्यानं त्यांनी कोविडवर उपचार करणाऱ्या दोन प्रमुख खाजगी रुग्णालयात 'बेड'साठी प्रयत्न केले. मात्र, तेथे 'बेड' उपलब्ध नव्हते. त्यामुळे नागपुरातील एका खाजगी रुग्णालयाच्या सांगण्यावरून रूग्णाला नागपूरला हलवण्यात आलं. मात्र, नागपूरला रूग्ण पोहोचल्यानंतर 'त्या' रूग्णालयानं चक्क घुमजाव करीत 'बेड' नसल्याचं सांगितलं. अखेर त्या वृद्ध रूग्णाला शेवटी सरकारी दवाखान्यातच भरती करावे लागले.


हा संपूर्ण घटनाक्रम आमदार अमोल मिटकरी यांनी अतिशय उद्विग्नपणे मांडला. खाजगी दवाखाने एका आमदाराला अशी वागणूक देत असतील तर सर्वसामान्यांचे काय? असा सवाल आमदार मिटकरींनी केला आहे. खाजगी दवाखान्यांच्या मुजोरीचा फटका श्रीमंत रूग्णांना बसत असेल तर गरिबांचं कसं होत असेल? असा सवाल आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या पोस्टमधून केला आहे. आमदार अमोल मिटकरींची पोस्ट आपलच सरकार आणि व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे.


कोण आहेत अमोल मिटकरी?


अमोल मिटकरी राष्ट्रवादीचे विधानपरिषदेतील आमदार आहेत. चार महिन्यांपूर्वी विधानसभेतून निवडून द्यायच्या जागेवर त्यांची बिनविरोध निवड झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते कट्टर समर्थक आहेत. अजितदादांच्या पुढाकारानेच अमोल मिटकरींना आमदारकी मिळाली. ते पक्षाचे प्रवक्ते देखील आहेत.


आमदार अमोल मिटकरी यांची पोस्ट


'मी अनुभवलेली कालची एक निगरगट्ट रात्र'...


"माझ्या मित्रांचे वडील काल कोरोना पॉझिटिव्ह आले हे समजताच त्यांनी मला संपर्क केला. संपर्क याकरिता केला की त्यांच्या वडिलांना 'आयसीयू'मध्ये अॅडमिट करायला बेड आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. ज्यांनी फोन केला ते आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम होते. अकोल्यामध्ये 'आयकॉन' आणि 'ओझोन' असे दोन हॉस्पिटल आहेत. मात्र, तिथे त्यांची व्यवस्था होऊ शकली नाही. पैसा उपलब्ध असतानासुद्धा अकोला जिल्ह्यात बेड उपलब्ध न होणे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.


सर्वानुमते निर्णय घेऊन एका खाजगी डॉक्टरच्या सल्ल्यावरून आम्ही पेशंटला नागपूरमध्ये 'वोकार्ट' हॉस्पिटलला (बेड व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याचे सांगितल्यावर) त्यांच्यावर विश्वास ठेवून एका सुसज्ज ॲम्बुलन्समध्ये रात्री एक वाजता मेडिकल ऑफिसर घेऊन नागपूरला पाठवले. रात्री साडेतीन वाजता पेशंट घेऊन ॲम्बुलन्स त्या हॉस्पिटलसमोर पोहोचली. मला रात्री साडेतीन वाजता मित्रांनी कॉल केला व ॲम्बुलन्स बाहेर उभी आहे. मात्र, आत बेड उपलब्ध नाहीत, असे डॉक्टर सांगताहेत असे सांगितले. पेशंट फक्त ऑक्सिजनवर आहे आणि खाजगी डॉक्टरच्या सांगण्यावरून आपण तिथपर्यंत पेशंट पाठवल्यानंतर सुद्धा समोरच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करत नसतील तर ही बाब फार गंभीर आहे. मी तितक्याच रात्री एका खाजगी कोविड सेंटरवर काही डॉक्टर मित्र व मी अनेक डॉक्टरच्या संपर्कात राहिलो. मात्र, रात्री साडेतीन वाजता कुठल्याच डॉक्टरांनी प्रतिसाद दिला नाही.


नागपूरमधील लता मंगेशकर हॉस्पिटल, किंग्ज वे हॉस्पिटल, ऑरेंज सिटी हॉस्पिटल, ऍलेक्सीज हॉस्पिटल, 'वोक्हार्ट हॉस्पिटल, सेव्हन स्टार हॉस्पिटल आदी हॉस्पिटलमध्ये, डॉ. मुंदडा, डॉ. मरार, डॉ. अग्रवाल, सुजाता मॅडम, कावेरी मॅडम आदी डॉक्टरांशी संपर्क केला. मात्र, या सर्व श्रीमंत डॉक्टरांपैकी कोणीही कुठलाही कसलाही प्रतिसाद दिला नाही.


नंतर वर्धा, सावंगी मेघे याठिकाणी फोन केले. पेशंटला परत इथे आणावे का?, तर अकोल्यातील सर्व दवाखान्यात फोन केले. सरकारी दवाखाने हाउसफुल, प्रायव्हेट दवाखाने हाउसफुल, नागपुरमधील दवाखाने हाउसफुल, पेशंटकडे स्वतःच्या गाड्या आहेत. अनेक मोठ्या लोकांशी संपर्क आहेत. असे असतांनासुद्धा पेशंटला एक व्हेंटिलेटर व बेड उपलब्ध नसणे हे फार धक्कादायक आहे. अखंड प्रयत्नानंतर शेवटी सरकारी दवाखान्यातच सद्यस्थिती पेशंटला भरती करावे लागले आहे. (विचार करण्यासारखी बाब ही की मी आमदार असतांना व पेशंट सुद्धा आर्थिक सक्षम असतांना जर प्रायव्हेट डॉक्टर्स असा जीवघेणा खेळ खेळून, रात्री फोन बंद करून प्रतिसाद देत नसतील तर सामान्य माणसाचं जगणं म्हणजे हा एक फक्त खेळ आहे?, असे समजायचे का?? )


श्रीमंत लोकांची अशी अवस्था तर गोरगरिबांच्या अवस्था किती बिकट असतील ना? आता ह्या साखळ्या शोधून काढाव्या लागतील. मग आमच्या जीवाशी खेळायची वेळ आली तरी बेहत्तर. मात्र हा माज, ही मस्ती अशीच सुरु राहिली तर येणाऱ्या काही दिवसात प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाच्या व्यक्ती जग सोडून गेलेल्या असतील.


आपल्या सर्वांनी मिळून आता हे संकट ओळखायला शिकलो पाहिजे. गरजवंताना मदत करा. मी घेतलेला अनुभव फार भयानक होता. अशी वेळ शत्रुवरसुद्धा येऊ नये."


आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलेल्या भावना या राज्यातील जनतेच्या प्रातिनिधिक भावना आहे. त्यांनी राज्यातील खाजगी दवाखान्यांच्या असंवेदनशीलता, मुजोरी, मग्रूरीचा 'पंचनमा' आपल्या पोस्टमधून केला आहे. विरोधकांच्या यासंदर्भातील आरोपांना सरकार राजकारण म्हणून दुर्लक्ष करीत असेल. मात्र, आमदार अमोल मिटकरी हे सत्तेत महत्वपूर्ण भूमिका असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. योगायोगाने राज्याचं आरोग्यमंत्रीपद त्यांच्याच पक्षाच्या राजेश टोपेंकडे आहे. सरकारचे कान आपल्याच पक्षाच्या आमदारानं टोचल्यानंतरही सरकार याकडे खरंच लक्ष देणार का?, हाच खरा प्रश्न आहे.