Sandip Kshirsagar on Maratha Reservation Protest : बीड : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी संपूर्ण राज्यभरातील मराठा आंदोलक (Maratha Protestors) आक्रमक झाले आहेत. अशातच काहींकडून नेते आणि मंत्र्यांना टार्गेट केलं जात आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांच्या घरावर आंदोलकांनी हल्ला चढवला होता. आक्रमक आंदोलकांनी बंगला जाळला, तसेच आवारातही मोठी जाळपोळ केली. याबाबात संदीप क्षीरसागर यांनी फेसबुक पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, योग्य वेळी पुराव्यानिशी बोलेनं, असंही संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार संदीप क्षीरसागर यांनी फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलं आहे की, घरावर हल्ला झाला तेव्हा सर्व कुटुंब घरातच होतं,  हल्ला मराठा समाजानं किंवा स्थानिक लोकांनी केलेला नसून काही समाजकंटकांनी केला असावा, याबाबत योग्य वेळी पुराव्यानिशी बोलेनं, असं ते म्हणाले आहेत.


आमदार संदीप क्षीरसागर यांनी फेसबुक पोस्ट करून मांडली भूमिका... 


"30 ऑक्टोबर 2023 रोजी बीड शहरात अनेक जाळपोळीच्या घटना घडल्या. माझ्या राहत्या घरावर देखील हल्ला झाला. माझे मुल, पत्नी आणि सर्व कुटुंब यावेळी घरातच होते पण मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या व परमेश्वराच्या आशिर्वादाने आम्ही सर्वजण सुखरूप आहोत.", असं आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. 


"मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक आंदोलने केली. अतिशय शांततेत व शिस्तीत सर्व आंदोलन करणारा माझा मराठा बांधव हिंसक आंदोलन करू शकणार नाही. काल जो प्रकार घडला तो मराठा समाजाने किंवा स्थानिक लोकांनी केलेला नसुन काही समाजकंटकांनी केला असावा. याबाबत आताच काही बोलणार नाही, तसेच योग्य वेळी पुराव्यानिशी बोलेल.", असं संदीप क्षीरसागर फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत. 


"मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच आहे. त्यांच्या तब्येतीची माझ्यासह आपल्या सर्वांना काळजी आहे. सरकारनं या बाबतीत तातडीनं योग्य आणि सकारात्मक निर्णय घ्यायला हवा. सकल मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीला सुरुवातीपासून मी पाठिंबा दिलेला असून शासन दरबारी पत्राद्वारे मी ही मागणी देखील केली होती. ही मागणी होऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लावण्यासाठी मी देखील प्रयत्न करत राहणार आहे.", असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.