पंढरपूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेकांनी सत्तेसाठी भाजपात प्रवेश केला होता. मात्र राज्यात झालेल्या राजकीय नाट्यामध्ये तीन पक्षांचे आघाडी सरकार राज्यात आले आणि या आमदारांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली होती. हे आमदार पुन्हा घरवापसी करणार अशी चर्चा सुरु असताना आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या आजी-माजी आमदारांची राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरु असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.
आज रोहित पवार विठ्ठल दर्शनासाठी आले असता माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांचे सोबत करमाळ्याचे आमदार संजय शिंदे , बारामती शुगरचे उपाध्यक्ष सुभाष गुळमे, अभिजीत पाटील आदी उपस्थित होते .
वीज बिलाबाबत आपण घेतलेल्या भूमिकेवर घुमजाव करताना भाजपामुळे वीज कंपन्या आर्थिक अडचणीत आल्याचे सांगत आता शासनाने आणलेल्या नवीन योजनेनुसार वीज भरलेल्या रकमेपैकी 66 टक्के रक्कम त्या गावासाठी आणि त्या जिल्ह्यासाठी खर्च केली जाणार असून उरलेले 33 टक्के रक्कम वीज कंपन्याला मिळेल असे रोहित पवार यांनी सांगितले.
सध्या नामांतराबाबतही रोहित पवार यांच्या वक्तव्याबाबत सर्वत्र चर्चा सुरु असताना आपण जे बोलतो ती पक्षाचीच भूमिका असते असे सांगत नामांतरापेक्षा इतर प्रश्न महत्वाचे असल्याचे स्पष्ट संकेत रोहित पवार यांनी दिले. MPSC ही स्वायत्त संस्था असून त्यांनी घेतलेला निर्णय शासनाशी चर्चा करून घेणे अपेक्षित होते असे सांगत यापुढे असे वाद होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर कर्नाटक भाजप आमदार, खासदार भडक विधाने करत असून केंद्रातही भाजपचे सरकार आहे. राज्य सरकार याबाबत ठाम असले तरी केंद्रानेच मध्यस्थाची भूमिका घेत हा प्रश्न सोडवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी पक्षाकडून सर्वे केला जाणार असून जनतेची मतेही विचारात घेतली जातील. शरद पवार आणि अजितदादा यांच्या डोक्यात एक-दोन नावे असून पंढरपूरवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असे रोहित पवार यांनी सांगितले .