मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची (NITI Aayog) सातवी बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. नीती आयोगाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना योग्य स्थान न दिल्याचा दावा करत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टोला लगावलाय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांच्या या टीकेला 'सत्तेत नसल्याचं दुखणं बाहेर येत आहे,' असे प्रत्यूत्तर भाजपने दिले आहे. 


काय म्हटले आहे रोहित पवारांनी
"एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात" असं रोहित पवार यांनी म्हटले आहे. त्यांनी फेसबुवर एक पोस्ट लिहून आपले मत व्यक्त केले आहे. 



रोहित पवार यांच्या या टीकेनंतर भाजप आमदार राम कदम यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रपतींनी संबोधित केले त्यावेळी एकनाथ शिंदे हे पहिल्या रांगेत होते. त्यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ उभे होते. त्यावर ते काही बोलत नाहीत, परंतु, शेवटच्या रांगेवरून टिप्पणी केली जात आहे. अशा गोष्टींवरून टीका करणं योग्य नाही. यातून त्यांचं सत्तेत नसल्याचं दुखणं बाहेर येत आहे. फोटो काढत असताना थोडंसं पुढं मागं झालं असेल. पण त्यावेळी नक्की काय झालं होतं? हे तपासून पाहावं लागेल, असे राम कदम यांनी म्हटले आहे. 


व्हिडीओ