Devendra Fadnavis on OBC : मी निवडून येत असलेल्या नागपूर मतदारसंघामध्ये ओबीसी सर्वाधिक असून त्यांच्यामुळेच मी निवडून येत आहे. त्यांच्यामुळेच मी घडलो, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत राष्ट्रीय ओबीसी अधिवेशनात बोलताना केले. राज्यात 2014 ते 19 या कालावधीमध्ये ओबीसीसंदर्भात 22 पैकी 21 निर्णय मुख्यमंत्री म्हणून आपण घेतल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार ओबीसींच्या हक्कांचे रक्षण करेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. फडणवीस यांनी अधिवेशनाला संबोधित करताना सांगितले की, मी मुख्यमंत्री असताना स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची निर्मिती केली. 2014 ते 19 या कालावधीमध्ये ओबीसीसंदर्भात 22 पैकी 21 निर्णय मुख्यमंत्री म्हणून मी घेतले, ते आपण पाहू शकता.  


ओबीसींसाठी नोकरी, शिक्षण, हाॅस्टेल, विदेश शिष्यवृत्ती असेल, आयएएस, आयपीएस ट्रेनिंग असेल या सर्व मागण्या मान्य करून  शासन निर्णय जारी केल्याचे फडणवीस म्हणाले. त्यांनी सांगितले की, जे अपेक्षित निर्णय आहेत ते घेतले जातील, असेही त्यांनी नमूद केले. मी ओबीसी आरक्षण चार महिन्यात नाही आणलं, तर संन्यास घेणार म्हटले होते. तो मी हा व्यक्ती आहे. त्यामध्ये आणखी काही करण्याची गरज आहे ती करणार आहोत. 


मोदी सुद्धा ओबीसी 


फडणवीस यांनी बोलताना पीएम मोदी ओबीसी असल्याचा उल्लेख केला. ते म्हणाले की, पंतप्रधानांची कोणती जात नसते, पण पंतप्रधान मोदी हे ओबीसीतून येतात. केंद्र सरकारमधील 40 टक्के मंत्री ओबीसी समाजातून आहेत. त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्यातून आता डाॅक्टर होत आहेत. यासाठी अनेक वर्षांपासून मागणी होत होती, पण मोदींनी पूर्ण केल्याचे फडणवीस म्हणाले. या अधिवेशनाच्या व्यासपीठावरून होणाऱ्या निर्णयांची अंमलबजावणी तसेच ओबीसींच्या सन्मानासाठी जे काही असेल, ते करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.